![]() |
| (संग्रहित छायाचित्र) |
कारवाईची गरज; तरुण पिढी अवैध व्यवसायाकडे
सांगली / प्रतिनिधी
सांगली शहरात खुलेआम मटका सुरू आहे. अनेक टपऱ्या नव्याने सुरू झाल्या आहेत. यामध्ये मटका घेण्याचे काम सुरू असते. पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे तरुण पिढी मटक्यासह अवैध व्यवसायांच्या आहारी गेली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
सांगली शहरात काही काळ बंद असलेल्या अवैध व्यावसायिकांनी पुन्हा डोके वर काढले आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र त्यांचा आदेश अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पायदळी तुडविले आहेत. सांगली शहर, संजय नगर, विश्रामबाग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुलेआम मटका सुरू आहे. जुगाराचे अड्डे सुरू आहेत. याशिवाय चोरीछुपे गाजांची विक्रीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
तरुण पिढी अवैध व्यवसायाकडे वळली आहे. गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेचा विषय बनला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक घुगे यांनी गांभीर्याने कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे. सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मटक्यासह अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. अनेक हद्दपार आरोपी सांगली शहरात वावरत आहेत. त्यांना जेरबंद करण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन राबवावे अशी मागणीही नागरिक करत आहेत.
