शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचा इशारा
सांगली / प्रतिनिधी
खानापूर - आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास बाबर शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन केले आहे. त्यांच्या मतदार संघातून हा महामार्ग व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला किती मिळणार हे सांगावे, राजकीय दबावाखाली शक्तिपीठचे समर्थन करू नये. अन्यथा खानापूर - आटपाडी मधील शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीने दिले आहे.
समितीचे उमेश देशमुख, सतीश साखळकर म्हणाले, सुहास बाबर खानापूर - आटपाडी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. शक्तीपीठ महामार्ग त्यांच्या मतदार संघातून करावा असे वक्तव्य नुकतेच केले आहे. खानापूर तालुक्यातून यापूर्वी पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड महामार्ग प्रस्तावीत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गात जाणार आहेत. त्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकरी अस्वस्थ आहेत. त्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही.
शेतकरी आंदोलन करीत आहेत. गत तीन वर्षांत आमदार सुहास बाबर यांनी याबाबत चकार शब्दही काढलेला नाही. विजापूर गुहागर महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत झाल्या आहेत. त्याबाबत आमदार काहीच बोलत नाहीत. राजकीय दबावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने घ्यायचा विचार आहे काय? तसे असेल तर खानापूर आटपाडील शेतकरी देखील शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात उभा राहील. विकासाच्या आड आम्ही येणार नाही पण शक्तिपीठ मध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला किती मिळणार हे आधी आमदार बाबर यांनी सांगावे, असे आवाहन देशमुख, साखळकर यांनी केले आहे. यावेळी प्रभाकर तोडकर, प्रविण पाटील, उमेश एडके, यशवंत हारुगडे, सुनिल पवार आदी उपस्थित होते.
