yuva MAharashtra जत, तासगाव तालुक्यासाठी 'गुड न्यूज'

जत, तासगाव तालुक्यासाठी 'गुड न्यूज'

सांगली टाईम्स
By -

मोरबग्गी येथे नवीन एमआयडीसी मंजूर; तासगाव तालुक्यातील योगेवडी एमआयडीसीचा आराखडा सुरू

सांगली / प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य शासनाने जत तालुक्यातील मोरबग्गी येथे औद्योगिक वसाहतीला मंजूरी दिली आहे. तर उमदी औद्योगिक वसाहतीचे लवकरच गॅझेट प्रसिध्द होणार असून तासगाव तालुक्यातील योगेवाडी येथील औद्योगिक वसाहतीचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे नव्या वर्षात जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

शासनाच्या लेखी जत तालुक्याचा क्रमांक शेवटचा. पिढ्यानपिढ्या दुष्काळाचा शिक्का भाळी असणे ही या तालुक्याची आणखी ओळख. पाण्याच्या प्रतीक्षेत या तालुक्यातील अनेक पिढ्या खपल्या. परंतु आश्वासनाशिवाय त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. परंतु आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही महिन्यापूर्वी उमदी औद्योगिक वसाहत मंजूर झाल्याची घोषणा केली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 5 औद्योगिक वसाहतीच्या मंजुरीचे पत्र आमदार पडळकर यांच्या प्रचार सभेत दाखवत त्यावर शिक्कामोर्तब केले. आता उमदी औद्योगिक वसाहतीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.
उमदीचे गॅझेट लवकरच

एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोनवेळा जागेची पहाणी केली असून शासनाकडे माहितीसह प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच या एमआयडीसीचे गॅझेट निघण्याची शक्यता आहे. या वसाहतीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उद्योजक येण्यास इच्छूक आहेत. कर्नाटकातील काही सुरू उद्योजकांनी चौकशीही केली असल्याचे समजते.
मोरबग्गी २४.६३ हेक्टरवर

जत तालुक्यातील उमदी एमआयडीसी निर्मितीची प्रक्रिया सुरू असतानाच मोरबग्गी एमआयडीसीला शासनाने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारच्या शासनाची २४.६३ हेक्टर जमीन या एमआयडीसीसाठी हस्तांतर करण्यात येणार आहे. शासकीय जमिनीवर एमआयडीसी सुरू होणार असल्याने लवकरच जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

योगेवाडी आराखडा तयारी सुरू

गेल्या अनेक दिवसांपासून तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील योगेवाडी औद्योगिक वसाहतीचे काम आता अंतिम टप्यात आले आहे. ३६ हेक्टर क्षेत्रावरावर उभारल्या जात असणाऱ्या या औद्योगिक वसाहतीचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. भुसंपादन झाले असून आता अंतर्गत सुविधा निर्मितीलाही सुरवात होईल, अशी माहिती एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी सौ. वसुंधरा बिरजे जाधव यांनी दिली.






Tags: