![]() |
| स्वखर्चाने गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारताना सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण. |
दीपक चव्हाण यांचा उपक्रम; प्रशासनाचे डोळे कधी उघडणार
सांगली / प्रतिनिधी
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक गतिरोधक नियमबाह्य आहेत. त्यावर पांढरे पट्टे मारलेले नाहीत. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी नवीन वर्षात एक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. चव्हाण यांनी स्वखर्चाने गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली आहे. चव्हाण यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
चव्हाण यांचा नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो. स्वच्छतेसह देह विक्री करणाऱ्या महीलांसाठीचे त्यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. दरम्यान यावेळी त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या अशा प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी एक नावीन्यपूर्ण मोहीम हाती घेतली आहे. महापालिका क्षेत्रात अनेक रस्त्यांची कामे दर्जेदार झाली आहेत. गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. मात्र त्यावर पांढरे पट्टे मारलेले नाहीत. यामुळे गतिरोधक दिसत नाहीत. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
यामध्ये काहीना जीवही गमवावे लागत आहेत. एकीकडे प्रशासन अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह राबवत आहे. तर दुसरीकडे गतीरोधकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. हे लक्षात घेत चव्हाण यांनी स्वखर्चाने गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यास सुरवात केली आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी सातहून अधिक गतिरोधक रंगवत मोहिमेस सुरवात केली आहे. दरम्यान चव्हाण यांच्या या मोहिमेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
