yuva MAharashtra सांगलीच्या क्रीडा विश्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा

सांगलीच्या क्रीडा विश्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा

सांगली टाईम्स
By -

स्मृती मानधनाकडे भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ; १० जानेवारीपासून आयर्लंडविरुद्ध वन डे मालिका

सांगली / प्रतिनिधी

सांगली ची सुकन्या स्मृती मानधनाकडे भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. स्मृती मूळची सांगलीची. त्यामुळे सांगलीच्या क्रीडा विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सांगलीच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयर्लंड विरुद्ध वन डे मालिकेत ती भारतीय संघाचे नेतृत्व करेल.

स्मृती भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू आहे. आक्रमक सलामवीर अशी तिची ओळख आहे. भारतीय महिला संघाला १० जानेवारीपासून आयर्लंड विरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळायची आहे. राजकोट येथे पहिला सामना होणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. विद्यमान कर्णधार हरमनप्रीत कौर हिला विश्रांती देण्यात आली आहे. तिच्या जागेवर आता भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व सांगलीची सुकन्या स्मृती मानधना करणार आहे. स्मृतीने भारतीय क्रिकेट संघात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ असा

स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रोड्रिक्स, उमा छेत्री, रीचा घोष, तेजल हसबनीस, राघवी बिस्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तीतास साधू, सायमा थाकोर व सायली सातघरे.

अनेक वेळा दर्जेदार फलंदाजी, क्षेत्ररक्षण केले आहे. सांगलीच्या क्रीडा विश्वात यामुळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगली ही जशी नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते तशीच क्रीडा पंढरी म्हणूनही ओळखली जाते. अनेक नामवंत, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. कब्बडी, खोखो, कुस्ती, क्रिकेट मध्ये सांगलीच्या खेळाडूंनाही नेहमीच त्यांच्या दर्जेदार खेळाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. स्मृतीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघही निश्चित चांगली, उठावदार कामगिरी करेल अशी आशा सांगलीकर व्यक्त करत आहेत.

Tags: