सांगली / प्रतिनिधी
महापालिकेने नव्याने केलेल्या सर्व्हेत वाढीव घरपट्टी आकारण्यात आली आहे. महापालिकेने चुकीच्या आधारावर घरपट्टीत वाढ केली आहे. ती रद्द करावी यामागणीसाठी सोमवारी कुपवाड मध्ये बंद पाळण्यात आला. येथील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सर्व पक्षीय कुपवाड शहर संघर्ष समिती व व्यापारी संघटना कुपवाड यांच्यावतीने या आंदोलनाची हाक देण्यात आली होती. आंदोलनात हजारो कुपवाडकर सहभागी झाले होते.
घरपट्टीच्या कक्षेत नसलेल्या मालमत्ता शोधण्यासाठी महापालिकेने एका खासगी संस्थेच्या मदतीने नव्याने मालमत्तांचा सर्व्हे केला आहे. त्यानुसार घरपट्टीची बिले आकारण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात कुपवाड मध्ये घरपट्टीची बिले वाटण्यात आली आहेत. यामध्ये अनेकांना वाढीव बिले आल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मालमत्ताधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वाढीव बिले रद्द करावीत अशी मागणी होत आहे.
याकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सर्व पक्षीय कुपवाड शहर संघर्ष समिती व व्यापारी संघटना कुपवाड यांच्या वतीने सोमवारी कुपवाड शहर बंद व रास्तारोकोची हाक देण्यात आली होती. याला मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो कुपवाडकर रस्त्यावर उतरले. रास्तारोकोमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी माजी नगरसेवक तथा भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी नगरसेवक गजानन मगदूम, प्रशांत पाटील यांचेसह काँग्रेसचे सनी धोत्रे, व्यापारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटना, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
