हातनूर पशुवैद्यकीय रुग्णालयातील शिपायाची करामत; जिल्हापरिषदेच्या सीईओंचा कारवाईचा इशारा
सांगली / प्रतिनिधी
पदोन्नती मिळविण्यासाठी हातनूर (ता. तासगाव) येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील शिपायाने चक्क राजस्थानमधील एका विद्यापीठाचे बोगस प्रमाणपत्र जोडल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. प्रशांत रामचंद्र कुंभार असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सबंधित शिपायाला खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. चौकशीमध्ये तो दोषी आढळल्यास प्रसंगी बडतर्फीची कारवाई होऊ शकते, असे संकेत धोडमिसे यांनी दिले आहेत.
कुंभार हा तासगाव पंचायत समितीअंतर्गत हातनूर पशुवैद्यकीय रुग्णालयात शिपाई म्हणून नियुक्त आहे. त्याने बांधकाम उपविभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर नियुक्ती मिळविली आहे. त्यासाठी बनावट शैक्षणिक कागदपत्रे सादर करुन शासनाची फसवणूक केल्याचा ठपका जिल्हा परिषदेने ठेवला आहे. १५ ऑक्टोबररोजी त्यांना या पदावर पदोन्नती व पदस्थापना देण्यात आली. या पदोन्नतीसाठी त्यांनी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (स्थापत्य अभियांत्रिकी) या पदवीचे प्रमाणपत्र जोडले होते.
तर बडतर्फची कारवाईबनावट पदवी प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल प्रशांत कुंभार यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. तो सादर करण्यास त्यांनी मुदत मागून घेतली आहे. चौकशीअंती ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर प्रसंगी बडतर्फीचीही कारवाई होऊ शकते.- तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी.
ही पदवी राजस्थानमधील बिकानेर येथील महाराजा गंगासिंह विश्वविद्यालय येथून घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. पदोन्नती प्रक्रियेदरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने हे प्रमाणपत्र फेरतपासणीसाठी संबंधित विद्यापीठाकडे २८ नोव्हेंबररोजी पाठविले, त्यावेळी ही पदवी बनावट असल्याचे विद्यापीठाने जिल्हा परिषदेला कळविले. त्यामुळे बनावट पदवी सादर करुन शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका प्रशासनाने कुंभार यांच्यावर ठेवला आहे. खोटा दस्ताऐवज सादर करुन कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याचाही आरोप आहे.
धोडमिसे यांनी कुंभार यांना बजावलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, जिल्हा परिषद शिस्त सेवा नियमांच्या तरतुदीनुसार तुमच्यावर कारवाई का करु नये? याचा खुलासा सादर करावा. अन्यथा कारवाई केली जाईल. कुंभार याने जोडलेले प्रमाणपत्र तपासणीसाठी मिळताच बिकानेर विद्यापीठाने ते बनावट असल्याचे कळविले. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे यांना लिहिलेल्या पत्रात विद्यापीठाने म्हटले आहे की, ही पदवी विद्यापीठाने दिलेली नसून बनावट आहे. ती सादर करणारे प्रशांत रामचंद्र कुंभार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. कारवाई केल्याचे विद्यापीठाला कळवावे. दरम्यान या घटनेमुळे बोगस प्रमाणपत्रांचा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

