तासगाव / राजाराम गुरव
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील यल्लामा देवी यात्रा उत्साहात पार पडली. ग्रामीण पंचक्रोशी भागातील सर्वात मोठी यात्रा मानली जाते. मंदिरावरती आकर्षक विद्युत रोशनाई,सजावट करण्यात आली होती.या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते.दोन दिवसाच्या यात्रेनिमीत्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजीत केले जातात.
बैलगाडी शौकींनासाठी शर्यतीचे आयोजन, कुस्ती शौकीनासाठी जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन केले जाते. यात्रेमध्ये भेळगाडे, मिठाई दुकाने, खेळणी, पाळणे, नारळ व पुजा साहित्य विक्रेते यांची मोठी गर्दी होती. तमाशा,आर्केस्ट्रा असेही कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जंगी कुस्ती मैदानामध्ये लहानापासून ते मोठ्यापर्यंत ७५ हजार रुपयापर्यंत अंतीम कुस्तीचे आयोजन केले होते.
या कुस्ती मैदानात पैलवान संदीप मोटे विरुद्ध पैलवान संतोष जगताप याची ७५ हजार रुपयाची कुस्ती पार पडली यामध्ये संदीप मोटे याने संतोष जगतापवर एकलंगी पटावर विजय मिळवला .या सर्व यात्रेचे नियोजन ग्रामपंचायत, यात्रा कमेटीने नियोजन केल्याने यात्रा उत्साहात संपन्न झाली.

