![]() |
| श्री. भगवानदास केंगार |
सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांची मागणी
सांगली / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये (DPDC) जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्ह्यातीला एका कर्तव्यदक्ष, अभ्यासू, आदर्श सरपंच पैकी एकाला सदस्य म्हणून संधी द्यावी, अशी मागणी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांनी केली आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ग्रामीणविकास मंत्री यांना भेटणार असल्याचेही केंगार यांनी सांगितले.
केंगार म्हणाले, जिल्हा नियोजन समितीवर सरपंच प्रतिनिधीची निवड झाल्यास अनेक छोटी - मोठी कामे, प्रश्न मार्गी लागतील. आमदार, खासदार, मंत्र्यांच्या बगलबच्यांची जिल्हा नियोजनवर वर्णी लागते. त्यांच्याकडून विकासात्मक कामे होत नाहीत. गावातील नागरिकांना, ग्रामपंचायतींना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे अनेक छोट्या छोट्या गावातील प्रश्न मार्गी लागत नाहीत.
केंगार म्हणाले, गेल्या ४ वर्षापासून शेड्याळ तालुका (जत) येथील जिल्हा नियोजन समितीमध्ये अनेक वेळा ४-५ कामाचे प्रस्ताव दिले तरीही जिल्हाधिकारी व स्थानिक आमदार खासदार व जिल्ह्याचे पालकमंत्री याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पक्षपातीपणा व जाती-पातीचे राजकारण या विकास कामात अडथळा ठरत आहे. अनेक छोट्या दुर्लक्षित गाव गाड्यात विकास कामे प्रलंबित राहिलेले आहेत. याबाबत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे.
जिल्हा नियोजन समिती केवळ कार्यकर्त्यांचे राजकीय पुनर्वसन करणारी नसावी. ती विकासात्मक असावी असे सांगत केंगार म्हणाले, सरपंच तळागाळातील कार्यकर्ता असतो. त्याचा गावातील, पंचक्रोशीतील नागरिकांशी, त्यांच्या समस्यांशी दररोजचा सबंध येतो. असा कार्यकर्त्यांना जिल्हा नियोजन वर संधी मिळाल्यास गावागावांमध्ये मोठी विकासात्मक कामे होतील.
