माजी मंत्री रामदास कदम उद्घाटक ; खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम ही राहणार उपस्थित
रत्नागिरी / प्रतिनिधी
साहित्य संमेलन, नाट्य संमेलन, शाळांच वार्षिक स्नेह संमेलनाचा उल्लेख आपण आपण सातत्याने एकतो, करतो. पण कुळाचे संमेलन म्हंटल्यावर थोड आश्चर्य वाटेल. होय रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मौजे जामगे येथे चक्क कदम घराणे कूळ संमेलन आयोजित करण्यात आले आहे. पुढील महिन्यात शनिवार ८ व रविवार ९ फेब्रुवारी रोजी हे संमेलन होईल. या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते होणार आहे. तर सांगलीतून या संमेलनास खासदार विशाल पाटील (कदम) व आमदार विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे कदम घराण्याचे हे यंदाचे ७ वे राज्यस्तरीय कूळ संमेलन आहे. या निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, व्याख्यान, कदंब राजवंशाचा ध्वजारोहण सोहळा, स्नेहभोजन, विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या कदम कुळातील मान्यवर बंधू, भगिनिंचा सन्मान अश्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता कुलदैवता श्री तुळजाभवानीचा जागरण, गोंधळाने संमेलनाची सुरवात होणार आहे. माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
राज्याचे विद्यमान गृहराज्यमंत्री योगेश कदम, ऊर्जा महिला व बालकल्याण खात्याच्या राज्यमंत्री मेघना कदम - बोर्डीकर, सांगली लोकसभा मतदार संघाचे खासदार विशाल पाटील, पलूस - कडेगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम, घाटकोपर विधानसभेचे आमदार राम कदम, आमदार बाबुराव कदम - कोहलीकर, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश कदम यांच्यासह राज्यभरातील कदम कुळातील मान्यवर व्यक्ती, कूळ बांधव, भगिनी उपस्थित राहणार आहेत.

