सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई
चोरीतील ९ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
सांगली / प्रतिनिधी
आरग (ता. मिरज) येथील पद्मावती देवीच्या मंदिरातील दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यास सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. अक्षय अर्जुन मोरे (वय २७, रा. गोंदीलवाडी रेल्वे गेट, पलूस - आमणापूर रस्ता, ता. पलूस, जि. सांगली) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीतील दिड किलो वजनाचे चांदीचे दागिने, १०६ ग्रॅमचे सोन्याचे दागिने तसेच दुचाकी असा ९ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अक्षय मोरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पलूस, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
आरग येथील मध्यवस्तीत असलेल्या पद्मावती मंदिरात चोरी झाल्याची घटना गुरूवार दि. ९ रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात शीतल आण्णासो उपाध्ये (रा. महावीर चौक, आरग, ता. मिरज ) यांनी फिर्याद दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वान पथक परिसरातच घुटमळले. चोरीचा घटना सीसीटिव्हीत कैद झाली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास गुन्हेगार अक्षय मोरे याने पद्मावती मंदिरातून दागिने चोरले असून त्याची विक्री करण्यासाठी तो पाचवा मैल परिसरात आला असल्याची माहिती मिळाली.
 |
| चोरट्यांकडून हस्तगत केलेलं चोरीतील दागिने. |
पोलीस पथकाने तातडीने परिसरात धाव घेवून सापळा लावला. काही वेळाने अक्षय मोरे पाठीला सॅक लावून दुचाकीवर तेथे थांबलेला पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिासांनी त्यास तातडीने ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता सॅकमध्ये सोने-चांदीचे दागिने आढळून आले. पोलीस चौकशीत त्याने चार दिवसांपूर्वी आरग येथील पद्मावती देवीच्या मंदिरातून चोरी केल्याची कबुली दिली. चोरीतील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरिक्षक सतीश शिंदे, स.पो.नि. पंकज पवार, पोलीस कर्मचारी अनिल कोळकेर, दरिबा बंडगर, सागर टिंगरे, नागेश खरात, सतीश माने, महादेव नागणे, अमर नरळे आदींनी सहभाग घेतला.