yuva MAharashtra सांगलीत कोयत्याच्या धाकाने वैद्यकीय प्रतिनिधीला लुटले

सांगलीत कोयत्याच्या धाकाने वैद्यकीय प्रतिनिधीला लुटले

सांगली टाईम्स
By -

१ हजार २०० रुपये लंपास ; दोघांविरोधात गुन्हा दाखल

सांगली / प्रतिनिधी

सांगली शहरातही कोयता गँगने डोके वर काढले आहे. कोयत्याचा धाक दाखवून शहरातील एका वैद्यकीय प्रतिनिधीकडून १ हजार २०० रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. शनिवारी दि. ११ रोजी दुपारी २ च्या सुमारास संजयनगर समोरील एका गॅस कार्यालयानजीक घडली. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रोहित अशोक कोथळीकर (वय ३४, रा. कोथळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती अशी,  फिर्यादी रोहित कोथळीकर हे दुपारच्या सुमारास डॉ. अशोक किल्लेदार यांना भेटण्यासाठी त्यांच्या दवाखान्यात निघाले होते. ते संजयनगर येथील एका गॅस कंपनीच्या कार्यालयानजीक आले असता त्यांना पाठीमागून आलेल्या दोघांनी गाडी आडवी मारुन अडविले. त्यातील एकाने फिर्यादी अशोक कोथळीकर यांना, तु माझ्या आडवी गाडी का मारलीस अशी विचारणा केली. 
तसेच संशयिताने अशोक यांच्या कानाखाली मारली. त्याचवेळी दुसऱ्या संशयिताने फिर्यादी अशोक यास पाठीमागून पकडले. अशोक यांना पुन्हा पहिल्या संशयिताने, मी इथला गुंड आहे. आताच सुटून बाहेर आलो आहे. तुझ्याजवळ असतील तेवढे पैसे दे असे म्हणून त्याच्याकडील कोयता काढून अशोक यांना दमबाजी केली. याप्रसंगी जबरदस्तीने अशोक यांच्या खिशातील १ हजार २०० रुपये हिसकावून घेतले आणि घटनास्थळावरुन पलायन केले.
Tags: