पुणे येथे व्हीएसआयकडून कारंदवाडी युनिटला उत्कृष्ठ तांत्रिक कार्य क्षमतेचा पुरस्कार राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्र पवारसाहेब व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडून स्विकारताना कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील व संचालक. समवेत माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, ना. बाबासाहेब पाटील, ना. शिवेंद्रराजे भोसले व मान्यवर.
कारंदवाडी युनिटला उत्कृष्ठ तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार
इस्लामपूर / प्रतिनिधी
सर्वोत्कृष्ट नियोजन, पारदर्शक कारभार, उच्चांकी दर देणाऱ्या राजारामबापू पाटील सहकारी साखर उद्योगाच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारखान्याच्या कारंदवाडी युनिटला उत्कृष्ठ तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार मिळाला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु: (पुणे) या साखर उद्योगातील शिखर संस्थेच्यावतीने हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रशांत लक्ष्मण पाटील यांना राज्यातील सर्वोत्कृष्ट शेती अधिकारी, तर वाटेगाव - सुरुल शाखेचे मुख्य अभियंता संताजी हैबतराव चव्हाण यांना राज्यातील सर्वोत्कृष्ट मुख्य अभियंता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील व कारखान्याचे संचालक-अधिकाऱ्यांनी कारंदवाडी युनिटचा पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
अध्यक्ष प्रतिकदादा पाटील म्हणाले, माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शना खाली वाटचाल करताना राजारामबापू साखर कारखान्यास अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आम्ही ही पुरस्कारांची परंपरा कायम ठेवल्याचा आम्हास आनंद व अभिमान आहे. या पुरस्कारांनी आम्हास निश्चितपणे प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल. आम्ही अधिक गतीने व अचूकपणे पुढील वाटचाल करू.
राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्र पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते पुणे येथील शानदार सोहळ्यात हे पुरस्कार वितरण करण्यात आले. याप्रसंगी व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार विशाल पाटील, आमदर विश्वजीत कदम, साखर आयुक्त कुणाल खेमनार यांच्यासह महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचेअध्यक्ष-उपाध्यक्ष,कार्यकारी संचालक, तसेच राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक व अधिकारी उपस्थित होते.
