yuva MAharashtra सोमवार आठवडा बाजार रस्त्याच्या एका बाजूला भरवावा

सोमवार आठवडा बाजार रस्त्याच्या एका बाजूला भरवावा

सांगली टाईम्स
By -

सोमवार आठवडा बाजार संदर्भात आमदार सुधीर गाडगीळ यांना निवेदन देताना सूरज पवार, मकरंद म्हामुलकर.

सूरज पवार, मकरंद म्हामुलकर ; आमदार सुधीर गाडगीळ यांना निवेदन

सांगली / प्रतिनिधी

महापालिकेच्या प्रभाग १० मधील रेल्वे स्टेशन समोरील रस्त्यावर दर सोमवारी भरणारा आठवडा बाजार रस्त्याच्या एका बाजूस भरायला हवा. दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरळीत राहील. वाहतूक कोंडी होणार नाही अशी मागणी भाजपाचे कार्यकर्ते सूरज पवार व मकरंद म्हामुलकर यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे केली आहे. याबाबत १५. दिवसात सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही आमदार गाडगीळ यांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले, रेल्वे स्टेशन समोरील रस्त्यावर दर सोमवारी आठवडा बाजार भरतो.  रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी तसेच अन्य विक्रेते बसतात. त्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद होतो. रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा मुख्य मार्ग आहे. परिणामी वाहतूक कोंडी होते. नागरिकांना ये जा करण्यात मोठे अडथळे निर्माण होतात. काही वेळा अपघात तर विकेत्यांशी नागरिकांचे वादही होतात. 

रस्त्याच्या एका बाजूला बाजार भरला तर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे असे सांगत पवार म्हणाले, याबाबत महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. पण कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे आमदार गाडगीळ यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. त्यांनी १५ दिवसांत यावर सकारात्मक निर्णय होईल अशी ग्वाही दिली आहे. याशिवाय प्रभागातील गांधी वसाहत आणि माकडवाले गल्लीमध्ये समाज मंदिर बांधण्यात यावे याबाबतही त्यांना साकडे घालण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.