मराठा समाज आक्रमक; सरपंच संतोष देशमुख खून निषेधार्थ आयोजन
सांगली / प्रतिनिधी
मस्साजोग (जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यात जन आक्रोश मोर्चे निघत आहेत. जालना परभणी, पुणे नंतर आता सांगलीतील मराठा समाजही आक्रमक झाला आहे. देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या मारेकऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी सांगलीतही येत्या २३ जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
मंगळवारी सांगलीत मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. स्थानिक पोलीस, एस.आय.टी, सीआयडी ची पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. परंतु अजूनही न्याय मिळत नसल्याची देशमुख कुटुंबाची भावना आहे.
मोर्चास सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, कन्या वैभवी देशमुख व त्यांचे कुटुंबीय यांच्यासह बीडचे खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, उपस्थित राहून मोर्चास संबोधित करणार आहेत.या बैठकीला विलास देसाई, संजय पाटील, अभिजित पाटील, दिग्विजय पाटील, संभाजी पाटील, विकास मोहिते, प्रदीप कर्वेकर, ऍड. उत्तमराव निकम, अशोकराव पाटील, स्वप्नील देशमुख, अशोक शिंदे आदी मराठा बांधव उपस्थित होते.
या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. पण सरकारकडून त्यांना पाठीशी घातले जात असल्याने मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगलीतही मंगळवारी मराठा समाजाची बैठक झाली. यामध्ये सांगलीत येत्या २३ जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
