![]() |
| दूषित पाणीपुरवठा प्रश्र्नी अधिकाऱ्यांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी व शामरावनगर मधील नागरिक. |
शामरावनगरमधील नागरिक आक्रमक; पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना विचारला जाब
सांगली / प्रतिनिधी
सांगलीतील प्रभाग क्रमांक १८ मधील शामरावनगर परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. चार नागरिकांना त्रास झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांच्या नेतृत्त्वाखाली पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरले. परिसरात शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.
महापालिका क्षेत्रात विशेषतः उपनगरांमध्ये दूषित पाणी पुरवठा सुरू आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांच्यामधून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. प्रभाग १८ मधील शामरावनगर परिसरातील जहीर मोहल्ला येथे गेल्या १५ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. नागरिक आजारी पडत आहेत. परिसरातील चार नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सलमान खान (वय २८), कादर इस्माईल शेख (वय ६०), छाया लोंढे ( वय ४२) व शहनाज जित्तिकर ( वय २१, सर्व जण रा.जहीर मोहल्ला, शामरावनगर, सांगली) अशी आजारी पडलेल्या नागरिकांची नावे आहेत.
दरम्यान यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी हिराबाग येथील वॉटर हाऊस वर मोर्चा काढला. सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारला. स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. यावेळी महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, सुनील पाटील यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत तातडीने पाणीपुरवठा सुरळीत व स्वच्छ करण्याची ग्वाही दिली. दरम्यान स्वच्छ पाणी न मिळाल्यास यापुढे दूषित पाण्याने अधिकाऱ्यांना आंघोळ घालू असा इशारा दळवी यांनी दिला आहे.
