yuva MAharashtra सांगलीतील राजकीय पदाधिकाऱ्यास जयसिंगपूरमध्ये मारहाण

सांगलीतील राजकीय पदाधिकाऱ्यास जयसिंगपूरमध्ये मारहाण

सांगली टाईम्स
By -

सांगलीत खळबळ; नेता उपचारासाठी रुग्णालयात 

सांगली / प्रतिनिधी

सांगलीतील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे बेदम मारहाण करण्यात आली. त्याचा एक  व्हिडिओ समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान मार लागल्याने सबंधित राजकीय पदाधिकारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला असल्याचे समजते. 
जुगार अड्ड्यावर ही मारहाण झाल्याची चर्चा असून याबाबत जयसिंगपूर पोलिस ठाण्यात अद्याप नोंद करण्यात आली नाही. मात्र, या घटनेचे व्हिडिओ सांगलीत व्हायरल झाले आहेत. अधिक माहिती अशी की, संबंधित पदाधिकारी हा कायम चर्चेत असतात. अनेक आंदोलनांत त्यांचा सक्रीय सहभाग असतो. चार दिवसांपुर्वी ते जयसिंगपूर येथील एका जुगार अड्डा परिसरात गेले होते. त्यावेळी तेथे व्हिडिओ करत होते. 
त्यावेळी टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली. अगदी अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. अंगावर शर्ट नसलेला, जखमी अवस्थेतील तो व्हिडिओ देखील तयार करत व्हायरल झाला आहे. व्हिडिओ मध्ये सबंधित पदाधिकारी हात जोडून माफी मागत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पण मारहाण का झाली याचा अजून उलगडा झालेला नाही. दरम्यान, त्या पदाधिकाऱ्यास उपचारासाठी तातडीने सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र, या मारहाणीची जयसिंगपूरसह सांगलीभर चर्चा सुरू आहे. याबाबत पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा अद्याप नोंद झालेला नाही.