सांगली / प्रतिनिधी
महाराष्ट्रात नव्याने २१ जिल्ह्यांची भर पडणार आहे. येत्या २६ जानेवारी रोजी याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामधे सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही तालुके मिळून नवा माणदेश जिल्हा होणार आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याचा यामध्ये समावेश असल्याचे समजते. दरम्यान नव्याने २१ जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याने महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या ५७ इतकी होणार आहे.
सद्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या ३६ आहे. तर पुणे, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती आणि नागपूर अशा सहा प्रशासकिय विभागात या जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. दरम्यान यापैकी काही जिल्ह्यांचे प्रशासकीय कार्यक्षेत्र मोठे आहे. प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने जुन्या जिल्ह्यांचे विभाजन करून नव्याने जिल्हा निर्मिती करण्याचा प्रस्ताव सन २०१८ मध्ये मुख्य सचिवांच्या समितीने मांडला होता.
नवा जिल्हा, कंसात मूळ जिल्हा
भुसावळ (जळगाव), उदगीर (लातूर), आंबेजोगाई (बीड), मालेगाव (नाशिक), कळवण (नाशिक), किनवट (नांदेड), मिरा भाईंदर (ठाणे), कल्याण (ठाणे), माणदेश (सांगली, सातारा, सोलापूर), खामगाव (बुलढाणा), बारामती (पुणे), पुसद (यवतमाळ), जव्हार (पालघर), अचलपूर (अमरावती), साकोली (भंडारा), मंडणगड (रत्नागिरी), महाड (रायगड), शिर्डी (अहिल्यानगर), संगमनेर (अहिल्यानगर), श्रीरामपूर (अहिल्यानगर) व अहेरी (गडचिरोली) या नव्या जिल्ह्यांचे प्रस्ताव आहेत.
एकूण २२ जिल्हे आणि ४९ तालुक्यांची नव्याने निर्मिती करणे असा प्रस्ताव होता. या अनुषंगाने सरकारने नव्याने २१ जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामधे सांगली, सातारा व सोलापूर मधील काही तालुक्यांचा मिळून माणदेश या नव्या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील आटपाडी या तालुक्याचा समावेश होण्याची शक्यता आहे.
