![]() |
| (प्रतीकात्मक छायाचित्र) |
दोघांना अटक; गायींची सुटका ; कुपवाड पोलिसांची कारवाई
सांगली / प्रतिनिधी
बेकायदेशीररित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने १५ गायींची वाहतूक केल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संशयित मेहबूब हुसेन जातकार (वय २४) व सद्दाम अमीनसाहब शेख (वय २४,दोघेही रा. कृष्णा घाट रोड, मिरज) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी कुपवाड पोलिस ठाण्याचे एक पथक तानंग परिसरात गस्तीवर होते. पंढरपूर ते मिरज रस्त्यावरील तानंग फाट्यावरून एक संशयितरित्या टेम्पो ( एम. एच. ०९ सी. यु. ९५२२)भरधाव वेगाने मिरजेकडे जात असल्याचे त्यांना दिसून आले. पथकातील कर्मचाऱ्यांनी टेम्पोला थांबवून टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोमध्ये १० मोठ्या गायी व ५ लहान गायी अशा एकूण १५ गायी आढळून आल्या.
पोलिसांनी संशयितांकडे चौकशी केली असता त्यांनी मेहबूब जातकार व सद्दाम शेख अशी नावे सांगितली. तसेच सदरच्या गायी कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी बेकायदेशीर मुक्या जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो सह १५ गायी जप्त करुन दोघा संशयितांना अटक केली. कुपवाड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
