![]() |
| माजी आमदार नितीनराजे शिंदे |
माजी आमदार नितीन शिंदे ; कामाच्या दर्जाची चौकशी करा
सांगली / प्रतिनिधी
येथील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये सुरू असलेले काँक्रीटचे काम निकृष्ठ दर्जाचे आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून काम रेंगाळले आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून या कामाची चौकशी करावी. ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे.
माजी आमदार शिंदे म्हणाले, सांगली मध्यवर्ती बस स्थानक आवारात काँक्रीटचे काम सुरू आहे. त्यामुळे नजीकच्या शहर बस स्थांनकामध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. पण आगार प्रमुखांच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय उन्ह आणि धुळीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. गाड्यांचे नियोजनही कोलमडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून आगारातील काम रखडले आहे. कामाचा दर्जाही चांगला नाही. ते निकृष्ठ दर्जाचे आहे.
तज्ञ अधिकाऱ्यांमार्फत या कामाच्या दर्जाची तपासणी करावी. ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी करत शिंदे म्हणाले, वास्तविक आगार प्रमुखांनी या कामावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. मात्र असे होताना दिसत नाही. याबाबत लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेणार आहे. सांगली आगारात सुरू असलेला मनमानी कारभार त्यांच्या कानावर घालणार आहे.
