सांगली / प्रतिनिधी
सांगली शहरात घरफोडी, चोऱ्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरातील जामवाडी येथील एका बंगल्यातून चोरट्याने तब्बल १० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. १ नोव्हेंबर २०२४ ते दि. १५ जानेवारी २०२५ या कालावधीत घडली. याबाबत अनिरुध्द चंद्रकांत सूर्यवंशी (रा. पटेल चौक, जामवाडी, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील नेहमी गजबजलेल्या पटेल चौकापासून नजीक असणाऱ्या जामवाडी परिसरात फिर्यादी सूर्यवंशी राहतात. घरामध्येच राहणाऱ्या त्यांच्या वहिनी प्रतिक्षा सूर्यवंशी यांच्या बेडरुममध्ये असलेल्या तिजोरीतील १० लाखांचे दागिने चोरीला गेले असल्याचे बुधवार दि. १५ रोजी त्यांच्या लक्षात आले.
यामध्ये सोन्याचा गोफ, सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चेन असा शंभर ग्रॅम वजनाचे दागिन्यांचा समावेश आहे. चोरीची माहिती मिळताच फिर्यादी सूर्यवंशी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आ अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
