yuva MAharashtra सांगलीच्या पालकमंत्री पदी चंद्रकांतदादा...!

सांगलीच्या पालकमंत्री पदी चंद्रकांतदादा...!

सांगली टाईम्स
By -
ना. चंद्रकांतदादा पाटील (पालकमंत्री सांगली जिल्हा)

सांगली / प्रतिनिधी

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांनी यापूर्वीही सांगलीचे पालकमंत्री पद भूषविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपसह विरोधी पक्षातील नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे सबंध आहेत. दरम्यान जिल्ह्याला चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री मिळाल्याने भाजप नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळणं हे माझं भाग्य आहे. सांगलीसारख्या सुसंस्कृत आणि कलासंपन्न जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी मला दिल्याबद्दल पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री मा. अमित शाह जी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी नड्डा जी, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेजी आणि मा. अजितदादा पवार यांना मनःपूर्वक धन्यवाद. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरून या जिल्ह्याची धुरा सांभाळताना सांगलीचा विकास करेन, असा विश्वास देतो. राज्यातील विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झालेल्या माझ्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा...!

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. ग्रामीण विकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. याशिवाय जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या बाबत अनुकूलता होती. दरम्यान राज्य सरकारने शनिवारी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. यामध्ये चंद्रकांतदादा पाटील यांच्या खांद्यावर सांगलीचे पालकत्व सोपविण्यात आले आहे.

Tags: