डॉ. तारा भवाळकर; सांगलीत काकासाहेब गाडगीळ पुरस्काराने सन्मान
सांगली / प्रतिनिधी
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला ही चांगली बाब आहे. मात्र मराठी भाषेला डावलले जाते ही तक्रार जुनीच आहे. तरीही मराठी भाषेविषयीची आस्था व अभिमान हा मध्ययुगापासून आहे असे मत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केले.
पुणे काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्यावतीने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांचा काकासाहेब गाडगीळ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी आमदार अनंतराव गाडगीळ, प्रतिष्ठानचे विश्वस्त जेष्ठ पत्रकार, केसरीचे माजी संपादक अरविंद गोखले, डॉ.अरुण गद्रे, अनंत बागाईतदार यांच्या हस्ते डॉ. भवाळकर यांना काकासाहेब गाडगीळ पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख २५ हजार रुपये,पुष्पगुच्छ,मानपत्र असे याचे स्वरुप होते. यावेळी प्रख्यात छातीरोगतज्ञ डॉ.अनिल मडके, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, पृथ्वीराज पाटील, समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, देशाच्या राजधानीत साहित्य संमेलन होत आहे.याच वेळी या साहित्य संमेलनाचे अध्ळक्षपद मला मिळाले,आणि याचवेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.ही खूप चांगली बाब आहे. परंतू मराठी भाषेला आधीच अभिजात दर्जा आहे. एकेकाळी संस्कृत भाषेला प्रतिष्ठा होती. मात्र ती सिमीत गटापुरती होती. संताच्या काळापासूनच मराठी भाषेचा दर्जा मोठाच आहे. ज्ञानेश्वरांनीही अमृताते पैजा जिंके असे पुर्वीच म्हटले आहे.निसर्गतः निर्माण झालेली ही भाषा आहे. एकनाथ महाराजांनी मराठी भाषेला प्राकृत म्हटले आहे. यामुळे मराठी भाषे विषयीची आस्था, अभिमान हा संतकाळापासूनच आहे.
अभिजात याचा अर्थ उच्च, सुसंस्कृत आहे. मात्र हे कुणी ठरवायचे? आज साक्षर भरपुर आहेत. सुशिक्षित आहेत की नाही याची शंका आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली असेल,त्याआधीही १८२९ मध्ये मिशनर्यांच्या शाळेपासून मुली शिकत होत्या. जेव्हा लिहिता-वाचता येत नव्हते. तेव्हापासून जीवनोपयोगी कामे करीतच होती. लिहिता-वाचता आले म्हणजे सुशिक्षितपणा येतो या अपसमजातून बाहेर यामहिलांना पुर्वीपासून सर्व काही येत होत,जात्यावरच्या ओव्यातून हे स्पष्ट होते.
प्रतिष्ठानचे विश्वस्त व केसरीचे माजी संपादक अरविंद गोखले म्हणाले, तारा भवाळकर यांना सारा देश ओळखतो, माणसाला अतंर्मुख करणारे लेखन त्यांचे आहे. तारा भवाळकर यांच्या लिखाणातून माणूस देव कधी होणार,हे विचारण्याची वेळ आहे. भवाळकर या एक प्रकारे विद्रोही विचाराच्या असल्या तरी त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या.लोककला,लोकसाहित्याचा अभ्यास असणार्या भवाळकरांची साहित्य मोठे आहे. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी अध्यक्ष अनंतराव गाडगीळ यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. सुत्रसंचालन महेश कराडकर यांनी केले.
