जप्ती केल्यास महापालिकेत ठिय्या मारू ; कुस्तीगीरांची मागणी
सांगली । प्रतिनिधी
कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी झटणार्या तालीम आणि व्यायाम शाळांना महापालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टीत सवलत द्यावी. राजाश्रयाने कुस्ती वाढली, टिकली आणि कराचे ओझे लादून ती संपवू नका, अशी मागणी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मोहिते, संभाजी पाटील-सावर्डेकर, पृथ्वीराज पवार यांच्यासह कुस्तीगारांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. जप्ती केल्यास महापालिकेत येवून बसू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
तालीम आणि व्यायामशाळांना आलेल्या नोटीसीबाबत ते म्हणाले, महापालिकेने तालमींना घरपट्टी, पाणीपट्टी लावली आहे. हा नवोदित खेळाडूंवर आघात आहे. काही तालमींना जप्ती नोटीस बजावली आहे. अशाने कुस्ती परंपरा टिकणार नाही. खेळाडू तयार होणार नाहीत. कुस्ती ही राजाश्रयाने वाढली, टिकली. सांगलीतून जागतिक स्तरावरील कुस्तीगीर घडले. आधी राजाश्रय होता, पुन्हा नगरपालिकांनी अनुदान दिले. आजही महापालिका खेळासाठी ५ टक्के खर्च करते, त्याचे स्वागत आहे. आपली सर्वांची ती जबाबदारी आहे, कारण खेळ टिकला पाहिजे.
तरुणांना कोणत्या मार्गाला न्यायचे?
सध्या चहूबाजूंनी तरुणाई संकटात आहे. ती नशेच्या आहारी जात आहे. अनेक युवक व्यसनातून खून करत आहेत. दरोडे, चोर्या, लूटमार करत आहेत. अशी तरुणाई आपणास हवी आहे का? आपणास सशक्त, प्रभावी पिढी घडवायची असेल तर कुस्ती, तालीम, खेळ जगले पाहिजे. या मार्गाकडे तरुणांनी वळावे, यासाठी प्रोत्साहन द्या, असे आवाहन कुस्तीगीरांनी केले.
आज तालमी ते काम नेटाने करत आहेत. अनेक संकटे आहेत. त्यावर मात करून केवळ कुस्ती परंपरेसाठी काम करत आहेत. त्यांनी लाखो रुपयांची घरपट्टी, पाणीपट्टी कुठून भरायची? या करातून तालमींना सूट देऊन कुस्तीला बळ द्यावे. यावेळी हंडे-पाटील तालमीचे सुजित हंडे-पाटील, आद्य बजरंग तालमीचे पृथ्वीराज पवार, कोरे तालीम मिरजचे मल्लू पाटील, बजरंग व्यायाम शाळेचे सुहास मोहिते, वसंतदादा कुस्ती केंद्राचे राहुल नलवडे, राजाराम पवार, जिल्हा तालीम संघाचे विराज बुटाले, पवार तालीमचे चंद्रकांत सूर्यवंशी, सरकारी तालीमचे अभिषेक पवार आदी उपस्थित होते.
