yuva MAharashtra जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा

जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा

सांगली टाईम्स
By -

 - माजी खासदार संजय पाटील 
 - शेतकर्‍यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण 

सांगली । प्रतिनिधी

अतिवृष्टी, सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबला गेला आहे. बँका, पतसंस्था, सोसायट्यासह खासगी सावकारांनी शेतकर्‍यांकडे कर्ज वसूलीसाठी तगादा लावला आहे. आधीच नैसर्गिक संकट त्यात कर्ज वसूलीचा तगादा यामुळे शेतकरी हवालदील झाला असून शासनाने तातडीने कर्ज वसूलीस स्थगिती द्यावी. शेतकर्‍यांची कर्जमापी करावी  अशी मागणी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केली आहे. यासह अन्य मागण्यांसाठी माजी खासदार पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांसह एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

या आंदोलनामध्ये जिल्हाभरातून हजारो शेतकरी सहभागी झाले होते. सातबारा कोरा झालाच पाहिजे, कर्ज वसूलीस स्थगिती मिळालीच पाहिजे आदी घोषणांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर शेतकर्‍यांनी दणाणून सोडला होता. पुढे बोलताना माजी खासदार पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे. द्राक्ष शेतीला पटका बसला आहे. पळे, भाजीपाला शेतीही उध्दवस्थ झाली आहे. पावसाची सातत्याने संततधार सुरुच आहे. यामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचेे आर्थिक नुकसान झाले आहे. द्राक्षबागांमध्ये पाणी साचून राहिल्याने यंदाचा द्राक्ष हंगाम अडचणीत आला आहे. यात भरीस भर म्हणून शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची वूसली सुरु आहे. बँका, सोसायट्या गप्प बसायला तयार नाहीत. शेतकर्‍यांना नाडण्याचे काम सुरु आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा.
कर्ज वसूलीस स्थगिती द्यावी.
नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने भरपाई द्यावी.
सरकारने शेतकर्‍यांच्या कर्जमापीची आश्वासन दिले होते. हीच वेळ आहे, सरकारने कर्जमापी करुन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. त्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी करत माजी खासदार पाटील म्हणाले, शेतीपिकाचे नुकसान होऊनही शेतकर्‍यांवर कर्ज वसूलीसाठी दबाव टाकला जात आहे. अशा अनेक तक्रारी येत आहेत. शासनाने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये असेही संजय पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी संजयकाका पाटील, प्रभाकर बाबा पाटील,चंद्रकांत कदम, प्रमोद शेंडगे, दिग्विजय पाटील, सुखदेव पाटील, गजानन कुल्लोळी, सुनिल पाटील, विक्रम पाटील, सुनिल जाधव, महादेव पाटील, नितीन पाटील, प्रभाकर पाटील, ईश्वर व्हनखंडे, नामदेव पाटील, संदीप पाटील, बाबासाहेब पाटील यांच्यासह संपूर्ण जिल्हाभरातून हजारो शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.



Tags: