![]() |
| जेरबंद चोरटा, जप्त मोटारसायकलसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी, पोलीस कर्मचारी. |
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची जबरदस्त कामगिरी
सांगली / प्रतिनिधी
गुन्हे प्रकटीकरणांध्ये माहीर असलेल्या सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणार्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. अमोल संभाजी साबळे (वय ४९, रा. चिंचणी, ता. तासगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ८ लाख रुपये किंमतीच्या १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप घुगे यांनी एलसीबीला मालमत्तेविरूद्ध गुन्ह्यातील संशयितावर कारवाईचे आदेश दिले होते. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी चोरट्याच्या शोधासाठी उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली खास पथक नियुक्त केले. या पथकातील सुशील मस्के यांना जुना धामणी रस्त्यावरील पलाश बिल्डकॉनजवळ अमोल साबळे हा विनानंबर प्लेट दुचाकी घेऊन संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली.
एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन साबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत विचारणा केली असता काही दिवसांपूर्वी मिरजेतील भोमाज हॉस्पीटलजवळून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरीची दुचाकी विक्रीसाठी आल्याचेही सांगितले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरून त्याचा मित्र सागर उत्तम पाटील (रा. मेघराजनगर, चिंचणी) याच्या घरासमोरील पत्र्याच्या मोकळ्या शेडमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. एलसीबीने चिंचणी येथे जावून पंचनामा करीत १९ दुचाकी ताब्यात घेतल्या. संशयित अमोल साबळे व जप्त दुचाकी महात्मा गांधी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.
