yuva MAharashtra मिरज तहसीलदारांच्या मनमानी कारभाराविरोधात महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार

मिरज तहसीलदारांच्या मनमानी कारभाराविरोधात महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार

सांगली टाईम्स
By -

- जय हिंद सेनेचा इशारा
- अध्यक्ष चंदन चव्हाण यांची माहिती

सांगली / प्रतिनिधी
मिरज तहसीलदार यांचा मनमानी कारभार सुरू आहे. शासन आदेश डावलत खासगी नोरराना पुन्हा रेकॉर्ड कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालयात रुजू करून घेतले आहे. वारंवार विरोध करूनही मिरज तहसिलदारांकडून मनमानी कारभार सुरू आहे या विरोधात आता थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुंबई येथील निवासस्थानासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा जय हिंद सेनेचे अध्यक्ष चंदन (दादा) चव्हाण यांनी दिला आहे.

चव्हाण म्हणाले, या प्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अवर सचिव विकास खारगे यांना पुराव्यानिशी तक्रार देण्यात आली असून, जिल्हाधिकारी सांगली यांनीही यावर कठोर भूमिका घेतली आहे. विशेष बैठक घेऊन लेखी आदेश व इशारे देण्यात आले आहेत. तरीही मिरज तहसीलदार खाजगी नोकरांना शासनाच्या नियमाविरुद्ध कामावर घेत असून, त्यांच्याकडे ओळखपत्रही नाहीत. शासनाच्या पारदर्शक कारभाराच्या धोरणाला हरताळ फासणाऱ्या या प्रकारावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे. 


ते म्हणाले, मिरज तहसीलदारांच्या कारभारविरोधात यापूर्वी जय हिंद सेनेने मिरज तहसील कार्यालयावर आंदोलन करत जनतेच्या उपस्थितीत पंचनामा केला होता. या लढ्याला दबावाने थोपवण्याचा प्रयत्न होत असून, ही लढाई जनतेच्या हक्कांसाठी आहे. “आम्ही दबावाला घाबरणारे नाही, गरज पडल्यास कायदा हातात घेण्याचीही तयारी आहे,” असेही चव्हाण यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान सरकारने पारदर्शक कारभारासाठी दिलेले आदेश जर अधिकारी पाळत नसतील, तर महसूल मंत्र्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी करत चव्हाण म्हणाले लवकरच महसूलमंत्र्यांच्या मुंबई येथील निवासस्थानासमोर आंदोलन करू.

Tags: