- ६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार प्रदर्शित
- राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शेखर रणखांबे यांचा नवा सिनेमा
सांगली / प्रतिनिधी
मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवे प्रयोग होत असतात. त्यातही लघुपटांच्या माध्यमातून आशयघन कथांद्वारे राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी छाप पाडणारा सांगली जिल्ह्याचा सुपुत्र व तरुण दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे आता प्रेक्षकांसाठी एका नव्या प्रवासाला सज्ज झाला आहे. त्यांचा पहिला पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट 'रुबाब' येत्या ६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
शेखर रणखांबे यांचे नाव घेतले की सर्वप्रथम आठवतो तो रेखा हा लघुपट. सामाजिक आशयाला भिडणाऱ्या या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि रणखांबे यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत झळकले. याआधी रेखा, पॅम्पलेट, मूक, धोंडा या लघुपटासह त्यांनी केलेले अनेक लघुपट देश-विदेशातील महोत्सवांमध्ये गाजले आहेत. प्रत्येकवेळी वेगळा विषय, वास्तवाशी भिडणारी कहाणी आणि तरल भावविश्व हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य राहिलं आहे. त्यांची प्रतिभा पाहून मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. रेखा या लघुपटाची निर्मिती त्यांनी स्वतः केली आणि रणखांबे यांचा आत्मविश्वास वाढवला. लघुपटांतून सशक्त प्रयोग केल्यानंतर आता रणखांबे हे पूर्ण लांबीच्या सिनेमात दाखल होत आहेत, ही संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे.
![]() |
| दिग्दर्शक शेखर रणखांबे |
या नव्या सिनेमाचा प्रस्तुतकर्ता झी स्टुडिओ आहे. तर संजय झणकर आणि गौरी झणकर हे निर्माते आहेत. झी स्टुडिओ म्हणजे नावीन्यपूर्ण विषय आणि गुणवत्तापूर्ण सिनेमाचे हमखास समीकरण. आतापर्यंत झी स्टुडिओने हात घातलेले अनेक चित्रपट गाजले आहेत. त्यामुळे रणखांबे यांचा पहिला सिनेमा झी स्टुडिओ प्रस्तुत करत आहे, ही त्यांच्यासाठीच नव्हे तर मराठी सिनेसृष्टीसाठीही मोठी पावती ठरणारी आहे. नुकतेच झी स्टुडिओच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून या चित्रपटाचे टायटल पोस्टर आणि रिलीजची तारीख जाहीर झाली. पोस्टरवरून हा सिनेमा एका सांगीतिक प्रेम कथेवर आधारित असावा, असा अंदाज प्रेक्षक बांधत आहेत. विशेष म्हणजे, पोस्टरमध्ये प्रमुख कलाकारांचे चेहरे उघड करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रहस्य आणि उत्सुकता अधिकच वाढली आहे.
प्रेमकथा हा मराठी सिनेमातील लोकप्रिय प्रकार असला तरी रणखांबे यांचा दृष्टीकोन वेगळा असेल, असा विश्वास त्यांचे आधीचे काम पाहिल्यानंतर बाळगायला हरकत नाही. सामाजिक भान, काव्यात्म मांडणी आणि संगीताचा सुरेख संगम हे या सिनेमाचे प्रमुख आकर्षण ठरू शकतात, अशी चर्चा आधीच सुरू झाली आहे. सांगलीसारख्या छोट्या शहरातून आलेला एक तरुण दिग्दर्शक सातत्याने मेहनत घेऊन, लघुपटांच्या माध्यमातून ओळख निर्माण करून अखेर मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री करत आहे. यामुळे स्थानिक कलावंत आणि रसिकांसाठीही हा अभिमानाचा क्षण आहे. आगामी काही दिवसांत या सिनेमाचे कलाकार, कथा आणि संगीताविषयी अधिक माहिती प्रेक्षकांसमोर येईलच. पण आत्तापुरते इतके नक्की की शेखर बापू रणखांबे यांचा हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीत नवा रंग भरणारा ठरेल. सहा फेब्रुवारी २०२६ रोजी झी स्टुडिओ प्रस्तुत रुबाब हा सिनेमा प्रदर्शित होत असून, तो मराठी प्रेक्षकांना नवा अनुभव देईल, अशी सर्वांना खात्री आहे.

