yuva MAharashtra विट्यातील नितीन जाधव टोळीला मोका

विट्यातील नितीन जाधव टोळीला मोका

सांगली टाईम्स
By -



- विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारीनी दिली मंजुरी 

- टोळीत दहा जणांचा समावेश

सांगली / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कार्वे गावातील राहुल गणपती जाधव या तरुणाच्या खुनातील संशयित नितीन जाधव टोळीला ‘मोका’ लावण्यास विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली. या कारवाईने आगामी सण, उत्सव, निवडणुकांच्या अनुषंगाने गुन्हेगारीचे कंबरडे मोडले आहे.

टोळी प्रमुख नितीन पांडुरंग जाधव (रा. कार्वे), सदस्य प्रफुल्ल विनोद कांबळे (वय २५), शंकर ऊर्फ दिपक पांडुरंग जाधव (वय ३७), रोहन रघुनाथ जाधव (वय २८, रा. कार्वे), गजानन गोपीनाथ शिंदे (वय ४६, रा. मंगरूळ), संतोष मारूती हजारे (वय ३७), अमृतराज शहाजी माळी (वय ४६), नैन ऊर्फ नयन रंगलाल धामी (वय २७, रा. कार्वे), माणिक संभाजी परीट (वय ३८, रा. मंगरूळ, मूळ रा. ऐतवडे खुर्द), प्रतीक ऊर्फ बाबू श्रीकांत मोरे (वय ३३, रा. बांबवडे, ता. शिराळा) यांना मोका लावण्यात आला. यापैकी टोळीप्रमुख नितीन जाधव हा अद्याप पसार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी राहुल जाधव हा रणजीतराज ढाब्यावर दारू पिण्यासाठी गेला होता. बिअर पिल्यानंतर तो माणिक परीट याला शिवीगाळ करू लागला.
टोळीविरूद्ध गंभीर गुन्हे..

नितीन जाधव टोळीने खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घातक शस्त्र बाळगणे, बेकायदा जमाव, शासकीय कामात अडथळा, आदेशाचा भंग करणे, अपहरण, घातक शस्त्राने मारहाण, हद्दपारीचा भंग, शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी अशी गुन्ह्याची मालिकाच सुरू ठेवली होती.
त्याला समजावून सांगत असतानाच तो ‘तुला ठेवतच नाही’ असे म्हणून विराट बार येथे गेला. दोन्ही गटात वाद झाल्यानंतर नितीन जाधव याच्यासह साथीदार एकत्र जमले. नितीन याने ‘राहुल यास ठेवायचे नाही, खल्लास करायचे’ असे म्हणून कट रचला. गुप्ती, तलवार, काठ्या, दांडकी घेऊन सर्वजण शोध घेत असताना कार्वे गावात स्मशानभूमीजवळ राहुल जाधवची मोटार अडवली. काचा फोडून तलवार, गुप्तीने वार केले. राहुल तशातच मोटार पुढे नेताना स्टेअरिंग ओढून मोटार पुलाला धडकवली. त्यानंतर राहुलला बाहेर ओढून पुन्हा तलवार, गुप्तीने वार करून निर्घृण खून केला. टोळीविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून नऊजणांना अटक केली. नितीन जाधव हा अद्याप पसार आहे. या गुन्ह्याचा तपास करताना नितीन जाधव व टोळी कोणताही कामधंदा न करता २०१९ ते २०२५ पर्यंत गुन्हे करत असल्याची माहिती समोर आली. टोळीने वर्चस्वातून, आर्थिक फायद्यासाठी दहशत निर्माण केली होती. टोळीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून आर्थिक फायद्याच्या जोरावर वर्चस्व प्रस्थापित केल्याचे तपासात निष्पन्न झाले.


टोळीविरूद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात ‘मोका’ चे वाढीव कलम लावण्यासाठी विट्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी अधीक्षक संदीप घुगे यांना प्रस्ताव पाठवला. तो विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांना सादर केला. त्यांनी अवलोकन करून दहा जणांच्या टोळीला ‘मोका’ लावण्यास मंजुरी दिली. विटा उपविभागाचे उपअधीक्षक विपुल पाटील यांच्याकडे तपास सोपवला आहे. अधीक्षक घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली विट्याचे निरीक्षक फडतरे, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, कर्मचारी बसवराज शिरगुप्पी, दिपक गट्टे, विलास मोहिते, वैभव कोळी यांच्या पथकाने कारवाई केली.


Tags: