◼️ रवींद्र चव्हाण
◼️ पृथ्वीराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
सांगली / प्रतिनिधी
पृथ्वीराज पाटील हे विकासाचा ध्यास घेऊन सातत्यपूर्ण काम करत आले आहेत. सहकार क्षेत्रातील काम लक्षवेधी राहिले आहे. त्यांनी भाजपवर विश्वास ठेवला त्यांचे नक्की भले होईल. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईत सह्याद्री निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपात प्रवेश झाला. त्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला. त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील यांच्या विचारांचा, कर्तृत्वाचा वारसा पृथ्वीराज पाटील चालवत आहेत. ते मनाने कधीच भाजपचे झाले होते, आज त्यांचा अधिकृत प्रवेश झाला आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांचे विकासाबाबतचे ध्येय स्पष्ट केले. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बळ देण्याचा शब्द दिला आहे. मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सहकारमहर्षी गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदापासून प्रमुख जबाबदाऱ्या पार पाडल्या. पृथ्वीराजबाबा समर्थपणे जनसेवा करत आहेत. ते भाजपात प्रवेश करताहेत, त्याचे स्वागत. मी भाजपात आलो तेंव्ही मी असे करू नये, असे अनेकजण सांगत होते. त्यात पृथ्वीराज पाटील हेही होते. युद्धात, राजकारणात वेळ चुकून चालत नाही. बाबा, देर आए, दुरुस्त आए. तुमची पंचसुत्री पूर्ण करण्याची ताकद काँग्रेसमध्ये नव्हती, ती भाजपात नक्की आहे. आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजीत देशमुख, आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्राम थोपटे आदी उपस्थित होते. श्री. पाटील यांनी शिवाजी महाराजांची मुर्ती देऊन रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, गुलाबराव पाटीलसाहेबांनी सहकार क्षेत्रासह काँग्रेस पक्षात अत्यंत जबाबदारीची पदे भूषवली. मीदेखील अनेक वर्षे विकासाचे धोरण घेऊन राजकारणात काम करतोय. दोन विधानसभा निवडणुका एक व्हिजन घेऊन लढवल्या. अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. विकासाची पंचसुत्री मी तयार केली होती. ती मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली. विकासाच्या मुद्यावर मी भाजपात येत असल्याचे त्यांना सांगितले. महाराष्ट्राचे विकासपुरूष देवेंद्रजींनी सांगलीच्या विकासाला बळ द्यावे, अशी मागणी केली. सांगलीला शुद्ध व मुबलक पाणीपुरवठ्यासाठी थेट चांदोलीतून पाणी द्यावे; ॲग्रोटेक हब म्हणून सांगलीचा विकास करण्यासाठी कवलापूर विमानतलाला मान्यता द्यावी; पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी कृष्णाकाठचा विकास व सीटी पार्कच्या जागेवर विकास करावा; विस्तारीत सांगलीचे प्रश्न प्राधान्याने सोडवावे; महिला सुरक्षेच्या व्यवस्था मजबूत कराव्यात; महापूरापासून बचावासाठी योजना राबव्यात, अशी मागणी केली आहे. हे सारे सुधीरदादांच्या साथीने करायचं आहे. भाजपकडे विकासाची दृष्टी आणि मजबूत धोरण असल्याने मी भाजपात आलो आहे. माझ्याप्रमाणे माझ्या कार्यकर्त्यांचा इथे सन्मान होईल, हा विश्वास आहे.

