- उच्च न्यायालय कोल्हापूर
- विटा पोलिसांकडून माफीनामा देण्याची तयारी
सांगली / प्रतिनिधी
विटा येथील विशाल कुंभार या वकिलांना पोलिसांकडून झालेल्या मारहाण प्रकरणाची सुनावणी प्रथमच मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंच यांच्यापुढे मंगळवारी चालली. यावेळी विटा पोलिसांचे कृत्य गंभीर असल्याबाबतची महत्वपूर्ण टिप्पणी उच्च न्यायालयाने केली. सुनावणी वेळी पोलिसांनी न्यायालयापुढे माफी मागण्याची तयारी दर्शविली. आजची सुनावणी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्यापुढे चालली. विशाल कुंभार यांच्यातर्फे ॲड. अनिकेत निकम काम पहात आहेत.
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच झाल्यावर विटा येथील ॲड. विशाल कुंभार यांना झालेल्या पोलिस मारहाण प्रकरणी चाललेल्या सुनावणीदरम्यान विटा पोलिसांचे कृत्य गंभीर स्वरूपाचे आहे अशी गंभीर टिप्पणी उच्च न्यायालयाने केली. निकम यांनी आज जोरदार युक्तिवाद करीत झालेला सगळा घटनाक्रम न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. निकम यांच्या युक्तिवादावर न्यायमूर्तिनी विटा पोलिसांचे कृत्य अत्यंत गंभीर आहे अशी महत्वपूर्ण टिप्पणी केली. पोलिसांतर्फे सहाय्यक सरकारी वकील विरा शिंदे यांनी यातील संबंधित पोलीस अधिकारी व पोलीस माफी मागायला तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले. ॲड.अनिकेत निकम पुढे म्हणाले की एकीकडे पोलीस विशाल कुंभार यांच्या दखलपात्र तक्रारीची दखल घेत नाहीत व कुठलाही गुन्हा दाखल करत नाहीत तर दुसरीकडे विशाल कुंभार यांचे विरुद्ध मात्र त्याच रात्री अदखल पात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करण्याचा अर्ज देखील मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेला आहे.
ही पोलिसांची भूमिका दुटप्पी स्वरूपाची आहे. त्यावर कोर्टाने सरकारी वकील विरा शिंदे यांना सांगितले की हे योग्य नाही. तसेच पोलिसांना तुम्ही सांगा की ॲड. विशाल कुंभार यांच्यावरील अदखलपात्र गुन्ह्या संदर्भात पुढे काहीही हालचाल करायची नाही किंवा कोणतेही पाऊल उचलायचे नाही. न्यायमूर्तीनी पोलिसांना पुढे अशाही सूचना दिल्या की पोलिसांची या प्रकरणा संदर्भात काय भूमिका आहे या विषयी सविस्तर प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करा. पुढील सुनावणी ३ सप्टेंबरला चालणार आहे. ॲड.विशाल कुंभार यांच्यातर्फे ॲड.अनिकेत निकम व ॲड.सुदत्त पाटील हे काम पाहात आहेत. यावेळी ॲड.सचिन जाधव, ॲड.प्रमोद सुतार, ॲड.विशाल कुंभार, ॲड.विक्रांत वडेर, ॲड.सीमा सुतार यांच्यासह सांगली व विट्याचे वकील मोठ्या प्रमाणात हजर होते.
