- आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा
- शिवसेना ओबीसी सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम चव्हाण यांची मागणी
सांगली / प्रतिनिधी
सांगली महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ५० कोटींचा निधी दिला आहे. परंतु त्यांच्या बगलबच्च्यांनी या निधीची पुरती वाट लावली असून अनावश्यक कामे घुसडली आहेत. काही कामे दुबार असल्याची चर्चा आहे. याची दखल घेत मनपा आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नियुक्त करावी. दुबार आणि बोगस कामे रद्द करावीत अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती शिवसेना ओबीसी, व्हीजेएनटी सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम चव्हाण यांनी दिली.
चव्हाण म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार परखड आणि सडेतोड स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत याकडे त्यांचा नेहमीच कटाक्ष असतो. याचा अनुभव अवघ्या महाराष्ट्राने वेळोवेळी पाहिला आहे. कोणतेही निकृष्ठ काम ते खपवून घेत नाहीत. दरम्यान अजितदादा यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी दिला आहे. या निधीतून दर्जेदार कामे होतील अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरताना दिसत आहे.
काही प्रभागात केलेली कामे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. विशेषतः सांगलीतील प्रभाग क्रमांक १७ व १५ तर कुपवाड मधील प्रभाग क्रमांक ८ मधील कामाबाबत समाजमाध्यमे, वर्तमानपत्रांमध्ये सातत्याने बातम्या येत आहेत. नागरिक तक्रार करत आहेत. अनेक कामे बोगस, निकृष्ठ दर्जा, दुबार असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असून ५० कोटी निधी मधून प्रस्तावित कामांची आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून चौकशी करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पुराव्यासह केली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

