yuva MAharashtra विकासनिधी ५० कोटींतील कामांची चौकशी करा

विकासनिधी ५० कोटींतील कामांची चौकशी करा

सांगली टाईम्स
By -

 


- सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांची मागणी
- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन

सांगली / प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी दिलेल्या ५० कोटी निधीतील कामांमध्ये अनियमितता झाली आहे. जिथे गरज तिथे कामे झालेली नाहीत. राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्‍यांनी गरज नसताना स्वतःच्या प्रभागातच कामे केली आहेत. यापैकी अनेक कामे दुबार, निकृष्ठ दर्जाची आहेत. या कामांची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हंटले आहे की, महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी आपण ५० कोटी रुपयांचा निधी दिला. याबाबत आपले सर्व महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या वतीने आभार. या निधीमधून दर्जेदार कामे होतील. शहरांच्या विकासाला हातभार लागेल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. अनावश्यक ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

सुस्थितीतील रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आले आहे. अनेक गटारी, काँक्रिट रस्त्यांची कामे निकृष्ठ आहेत. काही पदाधिकार्‍यांनी स्वतःच्या प्रभागातच मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. टक्केवारीसाठी निधीचा पुरेपूर दुरुपयोग करण्यात आला आहे. नागरिकांच्याही याबाबत अनेक तक्रारी आहेत. या कामांची चौकशी झाल्यास खरी वस्तुस्थिती समोर येईल. त्यामुळे तातडीने या कामांची चौकशी करावी अशी मागणी पटेल यांनी निवेदनामध्ये केली आहे.  
Tags: