◼️आमदार जयंत पाटील
◼️जयश्रीताईंना नव्या पक्षासाठी शुभेच्छा
सांगली। प्रतिनिधी
एखाद्यावर आरोप करायचे, त्याला जेरीस आणून पक्षात प्रवेश घ्यायचा ही आजच्या राजकारणात नवी पध्दत निर्माण झाली आहे. देशात अनेक स्थितंतरे आली, पण कृृष्णाकाठची माणसं विचाराला पक्की होती. या सर्वांनी विचारांची कास धरुन काम केले. त्याच विचारांनी सर्वांनी पुढे जायला हवे होते, पण आता परिस्थिती बदलली आहे. यामुळे काही वेगळे निर्णय होत आहेत, त्यावर मी काही बोलणार नाही, असे परखड मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
सांगलीत पत्रकारांशी ते बोलत होते. काँग्रेसच्या निलंबीत नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले, सर्वांनाच सत्तेत जायची घाई आहे. जयश्रीताईंना त्यांच्या नव्या पक्षासाठी शुभेच्छा. लोकसभा, विधानसभा निवडणूकांत आम्ही प्रमाणिकपणे आघाडीच्या उमेदवारांचे काम केले. महाविकास आघाडी म्हणून ते रास्तच होते. काही लोकांचा माझ्याविषयी त्यावेळी गैरसमज झाला, पण मी केलेले काम चुकीचे आहे असे म्हणणार नाही. मी माझ्या पक्षातच आहे, पक्षाची भूमिका मांडतो आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
जबरदस्तीने धर्मपरिवर्तन चुकीचेचजबरदस्तीने धर्मपरिवर्तन होत असेल तर ते योग्य नाही. त्यास विरोधच आहे. ऋुतुजा रोजगे प्रकरणात असे काही पुरावे असतील तर ते पोलिसांनी पुढे आणले पाहिजे. असे होणे योग्य नाही. पोलिसांनी खुलासा करणे गरजेचे आहे. धर्मांतराला लगाम घालण्याबाबत अनेक कायदे आहेत असेही आमदार पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
पूर येण्याची अनेक कारणे आहेत. ती कारणे दुरुस्त करण्यामध्ये सरकारने लक्ष घातले पाहिजे. पूर आल्यावर येथील लोक हवालदील होतात. पूर येणार नाही यासाठी योग्य वेळी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. अलमट्टी धरण उंची बाबात आंदोलन करणार्यांनाच सरकारने चर्चेसाठी बोलावले नाही. आंदोलनकर्त्यांना बोलावून सरकारने त्यांच्या शंकाचे निरसन करणे आवश्यक आहे. यात राजकारण करण्यापेक्षा लोकांच्यावर येणार्या संकटाला महत्व दिले पाहिजे. महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती करणेही चुकीचे आहे, असेही आमदार पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
