◼️अन्न व औषध विभागाचे दुर्लक्ष
◼️ तपासणीची गरज
◼️व्यावसाय परवानेही नाहीत
सांगली । प्रतिनिधी
सांगली शहरात खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे पेव फु टले आहे. यामध्ये सर्वाधिक चिकन ६५ विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. निकृष्ठ दर्जाचे चिकन नागरिकांच्या माथी मारण्याचे काम सुरु आहे. भजी, वडापावसह अन्य खाद्यपदार्थांमध्येही मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. प्रत्येक चौका-चौकामध्ये अशा विक्रेत्यांनी अनधिकृतपणे व्यावसाय सुरु केला आहे. याकडे अन्न व औषध विभागाने सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. विभागाने अशा विक्रेत्यांची तपासणी करावी. त्यांच्याकडील अन्न पदार्थांचे नमुने घ्यावेत अशी मागणी होत आहे.
सांगली शहराची अवस्था फास्ट फु डचे शहर अशी होत आहे. शहराच्या प्रत्येक चौका-चौकामध्ये खाऊ गल्ली निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कडेला फास्ट फु डचे गाडे सर्रास पहायला मिळू लागले आहेत. यामध्ये सर्वाधिक भजी, वडापावसह चिकन ६५ च्या गाड्यांची संख्या अधिक आहे. विशेषतः चिकन ६५ च्या गाड्यांवर मिळणार्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी आहेत. तिथे निकृष्ठ दर्जाचे चिकन, तेल, पीठ वापरले जात असल्याच्या तक्रारींनी जोर धरला आहे. भजी, वडापावच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. काही ठिकाणी दर्जेदार खाद्य पदार्थ मिळतात, पण बहुतांशी ठिकाणी ग्राहकांच्या घशात भेसळयुक्त पीठ, निकृष्ठ तेलापासून बनविलेले पदार्थ घातले जातात.
निकृष्ठ चिकन अन् भेसळयुक्त पीठचिकन ६५ साठी वापरले जाणारे चिकन काही ठिकाणी अत्यंत निकृष्ठ दर्जाचे वापरले जात असल्याचे समजते. पीठीच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. हरभरा डाळीच्या पिठामध्ये मक्याचे पीठ मिसळले जाते. तेलही निकृष्ठ दर्जाचे वापरले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. अन्न व औषध विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. खाद्य पदार्थांची तपासणी करणे गरजेचे आहे.
याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होऊ लागला आहे. विशेष म्हणजे बहुतांशी विक्रेत्यांकडे महापालिकेेचा व्यावसाय परवाना नाही. तरीही प्रत्येक चौकामध्ये बिनबोभाटपणे व्यावसाय सुरु आहेत. तिथे स्वच्छता नसते. शुध्द पाणी नसते. याकडे अन्न व औषध विभागानेही सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. विभागाकडून या विक्रेत्यांची साधी तपासणीही होत नाही. त्यामुळे विक्रेत्यांचे फावले आहे. शहरांत त्यांचे पेवच फु टले आहे. अन्न व औषध विभागाने अशा विक्रेत्यांची तपासणी करावी. त्यांच्याकडील पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
