◼️पृथ्वीराज पवार
◼️अन्न-औषध प्रशासनाला टाळे ठोकण्याचा इशारा
सांगली / प्रतिनिधी
कर्नाटक हद्दीत बनवला जाणारा कोट्यवधी रुपयांचा गुटखा जिल्ह्याच्या हद्दीत बिनदिक्कत येतो आहे. गोदामांत उतरवला जातोय आणि जिल्हाभर त्याचे वितरण करून कायद्याचा बोऱ्या वाजवण्यात आला आहे. या धंद्याला संरक्षण देऊ नका. हे गुटख्याचे रॅकेट मोडून काढा, अन्यथा अन्न-औषध विभागाला टाळे ठोकू, असा इशारा भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी आज दिला. अन्न-औषध प्रशासनात अचानक भेट देऊन त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत गुटख्यासंबंधीचे पुरावे हाती दिले.
ते म्हणाले, ‘‘पालकमंत्री चंद्रकांतदादांनी नशाखोरीविरोधात मोहिम उघडली आहे. गांजा, नशेच्या गोळ्यांचा बाजार मोडून काढला आहे. यात गुटख्याचे दलाल सुटता कामा नयेत. महाराष्ट्रात गुटख्याचे उत्पादन व विक्रीस बंदी आहे. तरीही जिल्हाभरात पानपट्टी, टपऱ्या, किराणा दुकानांमध्ये सहज गुटखा मिळतो. सांगलीतून पश्चिम महाराष्ट्र ते मुंबईपर्यंत मोठे रॅकेट काम करते आहे. ट्रक भरून मालाची आवक होते आहे. शेकडो टन गुटखा साठवणारे गोदाम आहेत. कर्नाटकातून म्हैसाळमार्गे सुभाषनगर आणि तेथून जिल्ह्यात गुटखा पोहचवला जातोय. त्याचे पुरावे आहेत.’’
ते म्हणाले, ‘‘अल्पवयीन मुलांसाठी तो अमली पदार्थासम आहे. या रॅकेटमध्ये ज्यांचा पुढाकार आहे, त्यांची नावे सादर करतोय. त्यांचे फोन रेकॉर्ड, लोकेशन तपासा, सगळा कारभार उघडा पडेल. या कारवाईत पोलिसांचे संपूर्ण सहकार्य मिळावे, अशी विनंती मी पोलिस अधीक्षकांना करतो आहे. पालकमंत्री पाठीशी आहे. मुख्यमंत्री स्वतः या काळ्या धंद्यांच्या विरोधात आक्रमक आहेत. अशावेळी अन्न-औषध प्रशासनाने कारवाईत कचुराई करू नये आणि कुणाला पाठीशी घालू नये. संबंधित यंत्रणांचे सहकार्य मिळत नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे तसेच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे तक्रार करू.’’
