yuva MAharashtra दुष्काळी पट्ट्यात बहरली रेशीम शेती

दुष्काळी पट्ट्यात बहरली रेशीम शेती

सांगली टाईम्स
By -

 


◼️४४३ एकरावर लागवड
◼️७ कोटींचे उत्पन्न
◼️३९३ शेतकऱ्यांचा सहभाग

सांगली / प्रतिनिधी 

जिल्ह्याचा दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असणाऱ्या जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर या तालुक्यांमध्ये द्राक्ष, डाळिंबासह आता रेशीम शेती ही बहरली आहे. जिल्ह्यात ३९३ शेतकऱ्यांनी ४४३ एकरांवर तुती रेशीम शेती केली असून यामध्ये सर्वाधिक वाटा हा दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचा आहे. या शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी तब्बल ७ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. 

रेशीम शेती उद्योग हा ग्रामीण भागातील लोकांचा आ‍र्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणारा, रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेला, कृषी संलग्न व शेतक-यांना कमी कालावधीत अधिक लाभ मिळवुन देणारा तसेच परकीय चलन उपलब्ध करणारा उद्योग आहे. महाराष्ट्राची भौगोलीक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास पुरक आहे. जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यात रेशीम शेती केली जाते. जिल्हा रेशीम कार्यालयाकडून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत, अनुदान सहाय्य, नोंदणी आणि जनजागृती केली जाते. प्रामुख्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, सिल्क समग्र - २ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्यास प्रोत्साहन दिले जाते. 
नव्याने २४६ शेतकऱ्यांकडून नोंदणी
रेशीम शेतीसाठी दरवर्षी डिसेंबर, जानेवारी महिन्यात जिल्हा रेशीम कार्यालयात शेतकऱ्यांची नोंदणी केली जाते. या वर्षी महारेशीम अभियानांतर्गत तब्बल २४६ शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाकडे नोंदणी केली आहे. या शेतकऱ्यांच्या माध्यमातून २५७ एकरवर रेशीम शेती केली जाणार आहे. सिल्क समग्र २ योजनेंतर्गत ५ एकर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना एकरी ३ लाख ७५ हजार (सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकरी) ते ४ लाख ५० हजार (अनुसूचित जाती - जमाती प्रवर्ग) रुपयांचे अनुदान दिले जाते. 
जिल्ह्यातही रेशीम शेतीला अनुकूल वातावरण आहे. विशेषतः तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि खानापूर तालुक्यात रेशीम शेती करण्याकडे करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात ३९३ शेतकऱ्यांनी ४४३ एकरांवर तुती रेशीम शेती केली असून यामध्ये दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यांना २ लाख ८ हजार ६५० अंडीपूंजीचे वाटप करण्यात आले होते. यातून जवळपास १२३.५८ मेट्रिक टन इतके रेशीम कोषांचे उत्पादन झाले आहे. वास्तविक या पट्ट्यात द्राक्ष, डाळिंब शेतीने बाळसे धरले असताना आता रेशीम शेतीही बहरू लागली आहे. 

यातून चांगले उत्पन्नही मिळू लागले आहे. सरासरी ४५० ते ७०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला असून उत्पन्नाचा आकडा ७ कोटी पर्यंत पोहचला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. वर्षातून चार ते पाच पिके घेता येत असल्याने रेशीम शेती हा शेतीला पूरक असा उत्कृष्ट जोडधंदा बनला आहे. याशिवाय एकदा केलेली तुती लागवड १० ते १५ वर्षे टिकते, कमीत कमी रासायनिक खतांचा वापर, घरातील प्रत्येक व्यक्तीला रोजगार, इतर पिकांच्या तुलनेत कमी पाणी व खते लागतात, बाजारपेठेत कोशांना चांगला भाव मिळत असल्याने रेशीम शेतीला शेतकरी आता प्राधान्य देऊ लागले आहेत. 


Tags: