◼️जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
◼️ पूर्ववैमनस्यातून सुऱ्याने भोसकले
सांगली / प्रतिनिधी
पूर्ववैमनस्यातून तसेच एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणातून सरफराज इराणी (वय २५) याचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून जिल्हा सत्र न्यायाधिश मिना एम. पाटील यांनी दोन आरोपींना जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. फिरोज अलिखान इराणी (वय ६०) आणि इरफान हैदरी फिरोज इराणी (वय ३५, दोघेही रा. ख्वॉजा कॉलनी, सह्याद्रीनगर, सांगली) अशी शिक्षा झालेल्या बाप - लेक आरोपींची नावे आहेत.
ही घटना दि. २०ऑक्टोबर २०१७ रोजी घडली होती. खटल्याची हकीकत अशी, संशयित फिरोज इराणी याचा मयत सरफराज हा भाचा आहे. बाप - लेकासह जैनबी हाशमी इराणी, मरियम नुरमहंमद इराणी आणि महाराणी फिरोज इराणी आणि सरफराज यांच्या जुन्या भांडणावरुन वाद आहे. तसेच एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणावरुन संशयितांचा सरफराज याच्यावर राग होता. दरम्यान त्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने संशयित पाच जणांनी त्यास ख्वॉजा कॉलनीत बोलवून घेतले. तेथे बाकीच्यांनी सरफराज यास धरुन ठेवले तर संशयित इरफान याने त्याच्याकडील धारदार सुऱ्याने त्याला भोसकले. जीवाच्या आकांताने ओरडून सरफराज खाली कोसळला. यावेळी सरफराज याचा भाऊ महंमद इराणी तेथे आला. परंतु इरफान याने त्यास पुढे आल्यास ठार मारण्याची त्यास धमकी दिली. आणि संशयित तेथून निघून गेले.
दरम्यान सरफराज याचा भाऊ, आई यांनी तातडीने त्यास सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केेले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. पोलिसांनी तातडीने चौघा संशयितांना अटक केली. तर इरफान मुलाणी यास दहा महिन्यानंतर अटक केली. सदर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकारपक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरुन न्यायमूर्तींनी आरोपी फिरोज इराणी आणि इरफान मुलाणी या बापलेकास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर अन्य संशयितांची मुक्तता केली. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, सहा. जिल्हा सरकारी वकील मकरंद ग्रामोपाध्ये यांनी काम पाहिले. संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रमेश भिंगारदेवे यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला.
