◼️ खासदार विशाल पाटील
◼️ माझ्या कामाची पद्धत त्यांना आवडली
सांगली / प्रतिनिधी
भाजपचे जेष्ठ नेते व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना माझ्या कामाची पद्धत आवडली असल्याने त्यांच्याकडून मला भाजप प्रवेशाची 'ऑफर' आहे. मी अपक्ष खासदार असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. मी अपक्ष म्हणूनच काम करीत राहिन, मात्र एखाद्या विषयावर गरज पडल्यास भाजपला पाठींबा देईन, असे खळबळजनक वक्तव्य खासदार विशाल पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला टंचाईच्या झळा बसत असून उपाययोजनांसाठी सरकारने जादा निधी देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
खासदार पाटील म्हणाले, मी आत्तापर्यंत भाजप प्रवेशाचा विचार केला नव्हता. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्रित काम केले पाहिजे. माझ्या कामाची पद्धत भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांना आवडली असेल, असे त्यांच्या ऑफरवरुन वाटतंय. सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षात कायद्याने प्रवेश करु शकत नाही. सव्वा चार वर्षाचा काळ अपक्ष म्हणून जाईल. मात्र जर कुठल्याही विषयांत पाठींबा द्यायची गरज निर्माण झाल्यास त्यांना पाठींबा द्यायची तयारी आहे.
शक्तिपीठला विरोध करण्याचे धोरण नाही
जिल्ह्यात कुठलाही हायवे येत असताना शक्तिपीठला विरोध करण्याचे धोरण माझे नसल्याचे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले. खानापूर-आटपाडी तालुक्यातून मोठा हायवे जावा, अशी त्या तालुक्यातील शेतकरी, व्यापार्यांची आणि खासदार म्हणून माझी इच्छा आहे. जिल्ह्यात शक्तिपीठाला संमिश्र विरोध आहे. ज्याठिकाणी हायवे नाहीत, तेथे घ्यावा. तो खानापूर-आटपाडीतून कराडला जोडावा, तेथून कोल्हापूरला जावू शकतो. दुसरा पर्याय खानापुरातून रत्नागिरी-नागपूर रोडला जोडावा. म्हणजे नदीकाठच्या गावांना त्रास होणार नाही. नदीकाठच्या जमिनीचे अधिग्रहण चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीतच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर दिली. ते म्हणाले, राजकारणामध्ये वर्तमानात चालावे लागते. खासदार विशाल पाटील यांच्याकडे अजून 4 वर्षे दोन महिन्यांचा कालावधी आहे. सांगलीच्या विकासासाठी त्यांनी भाजपबरोबर यावे. यामुळे जिल्ह्यातील विकासकामेही मार्गी लागतील. याशिवाय केंद्रातील भाजप खासदारांची संख्याही एकने वाढेल. त्यांनी भाजप प्रवेशाची जाहीर ऑफर देतो. त्यांनी या ऑफरचा विचार करावा.
