सांगली। प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेतून संपूर्ण राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिम स्वरूपात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे राज्यस्तरीय उद्घाटन आज दि. 1 मार्च 2025 रोजी पुणे येथून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय मोहिम शुभारंभ जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर यांच्या उपस्थितीमध्ये मिरज तालुक्यातील अजितराव घोरपडे विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंबी येथे करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनिस, शाळा मुख्याध्यापक डी. एन. पाटील, शिक्षक यांच्या समन्वयाने करण्यात आले.
राज्यातील 0 ते 18 वयोगटातील बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीची मोहीम सार्वजनिक आरोग्य विभाग एकात्मिक बालविकास विभाग शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट 0 ते 18 वर्ष पर्यंतच्या मुला मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा औषधोपचार शस्त्रक्रिया देऊन उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरवणे व सुरक्षित सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे असे आहे.
या मोहिमेच्या तपासणी पथकामध्ये पुरुष व महिला वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, ए. एन. एम. यांचा समावेश आहे. तपासणीमध्ये उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या बालकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मनपा रुग्णालय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करारबद्ध रुग्णालय, आर बी एस के करारबद्ध रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर मोहीम शुभारंभ प्रसंगी सर्व आरबीएसके वैद्यकीय पथकांमार्फत 2391 लाभार्थ्यांचे आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली.
.jpeg)