yuva MAharashtra राष्ट्रवादीचे लक्ष ‘स्थानिक स्वराज्य संस्था’

राष्ट्रवादीचे लक्ष ‘स्थानिक स्वराज्य संस्था’

सांगली टाईम्स
By -

 


◼️ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा ‘जय शिवराय’चा नारा
◼️पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पक्ष बळकट करू
◼️ प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील

 सांगली / प्रतिनिधी

मित्र पक्ष काय करतोय याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही कामाला लागा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील, सांगली जिल्हा वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, गुलाबराव पाटील आदी थोरांचा जिल्हा आहे. त्यामुळे हा संघर्ष नवा नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिलेल्या आश्वासनांचा पंचनामा करा, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी केले. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा येथील भोसले गार्डनला पार पडला. या मेळाव्यात आ. जयंत पाटील मार्गदर्शन करत होते. तर मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्र प्रभारी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. अरूण लाड, आ. रोहित पाटील, माजी आ. मानसिंगराव नाईक, सदाशिव पाटील, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महिला आघाडीच्या सुष्मिता जाधव आदी उपस्थित होते.

"जय शिवराय" चा नारा 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आता ‘जय शिवराय’ चा नारा दिला आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आता दूरध्वनीवरून पहिला शब्द ‘जय शिवराय’ उच्चारावा, अशा सूचना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी दिल्या. प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी भाषणाला सुरूवात करताना देखील ‘जय शिवराय’ शब्दाने केली. तर पश्चिम महाराष्ट्र पुरोगामी नेत्यांचा आहे. सरकारच्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा आणि पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात पक्ष बळकट करावा, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले.  

आमदार जयंत पाटील म्हणाले, ओबीसींसह अनेक लहान घटकांचे महामंडळ करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. पण अर्थसंकल्पात त्याची तरतूद नाही, शिवाय महामंडळ तयार करण्याचे प्रस्ताव देखील नाहीत. या घोषणा हवेत गेल्या. लाडक्या बहिणींना फसवले गेले आहे. ग्राहक न्यायालयात तक्रार केली तर सरकार बरखास्त होईल. सरकार विरोधात आता कार्यकर्त्यांनी जिल्हा व राज्यस्तरावरील लढाई करावी. सरकारविरोधातील प्रश्न मांडावेत. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा भाजपने निवडणुकीत दिला. राज्यात अल्पसंख्याक समाज सुरक्षित नाही. त्यांना दहशतीखाली रहावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दिलेल्या हक्कावर गदा आणण्याचे काम सुरू आहे. सध्या ‘पढेंगे तो आगे बडेंगे’ हा नारा महत्वाचा आहे. विधानसभेला भाजपाला यश आले. पण ही परिस्थिती आता राहणार नाही. 

म्हैसाळ प्रकल्प सोलरवर करण्याची तयारी मी मंत्री असताना केली. जत तालुक्यातील ६५ गावांना पाणी उपसा परवाना मिळवून दिला. टेंभू-ताकारी योजनेचे पाणी दुष्काळी भागाला दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. मित्र पक्ष काय करतात याकडे पाहू नका, तुम्ही कामाला लागा. नव्या चेहर्‍यांना आता संधी दिली जाणार असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत अपयश आले. त्याचे आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळाले म्हणून विधानसभा निवडणुकीत पक्ष हवेत होता. पण भाजपने तळागाळात प्रचार केला. त्यामुळे विरोधी पक्षनेता इतके संख्याबळ देखील मिळाले नाही. लाडकी बहिण योजना, शेतकरी प्रश्न, युवक प्रश्न याबरोबर महाविकास आघाडीत समन्वय नव्हता. त्यामुळे अपयश आले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. लाडकी बहिण फसवणुकीसह इतर प्रश्न जनतेत जाऊन मांडावेत. प्रत्येक निवडणुकीत वातावरण वेगळे असते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई करावी.

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र पक्षाचा बालेकिल्ला आहे. येणार्‍या निवडणुकीत जय शिवराय हा नारा दिला पाहिजे. दूरध्वनीवरून देखील पदाधिकार्‍यांनी प्रथम जय शिवराय शब्द उच्चारावा. विधानसभा निवडणुकीत अपयश आले. पक्षात कोण राहिले हे बघू नका. धर्मवीर संभाजी महाराजांप्रमाणे आहे ते सैनिक घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी कामाला लागावे. सरकारकडून समाजात दुही निर्माण करण्याचे काम सुरू आहे. युवकांनी भावनिक होऊ नये. नव्या उमेदवारीने कामाला सुरूवात करावी. शासकीय कार्यालयात खासगीकरण सुरू आहे. लाडक्या बहिणींची नावे रद्द होत आहेत. शक्तिपीठ विरोधात आंदोलन सुरू आहे. या सर्व मुद्द्यावर आता कार्यकर्त्यांनी आक्रमक व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आमदार रोहित पाटील म्हणाले, आ. जयंत पाटील यांच्यावर आता राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना राज्यभर काम करू द्या, विधानसभेच्या पराभवाने न खचता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कामाला लागावे. मित्रपक्षाला देखील बरोबर घ्यावे, असे आवाहन केले. आ. अरूण लाड व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी देखील मार्गदर्शन केले. मेळाव्याचे स्वागत शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी तर प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी केले. मेळाव्याला मनोज शिंदे, बाळासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, माजी नगरसेवक हरिदास पाटील, अभिजीत भोसले आदी उपस्थित होते.



Tags: