yuva MAharashtra जातीच्या दाखल्यांसाठी शिबीर; 2100 प्रस्ताव दाखल

जातीच्या दाखल्यांसाठी शिबीर; 2100 प्रस्ताव दाखल

सांगली टाईम्स
By -

 


◼️सांगलीतील शिबीरास मोठा प्रतिसाद 
◼️ प्रांत, अप्पर तहसिलदारांची उपस्थिती

सांगली । प्रतिनिधी

शासनाच्या १०० दिवस कृती आराखडा मोहिमेंतर्गत येथील प्रभाग क्रमांक दहा मध्ये वडार, धनगर, माकडवाले, कुंचीकोरवी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले वेळेत मिळावेत या उद्देशाने तीन दिवशीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिसरातील २१०० नागरिकांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यांना पंधरा दिवसांनी जातीच्या दाखल्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा  भटक्या व विमुक्त जाती सेलचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सूरज पवार यांनी दिली. यावेळी भाजपच्या कार्यकारिणीच्या सरचिटणीस गीताताई पवार उपस्थित होत्या.

मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे, सांगलीच्या अप्पर तहसिलदार अश्विनी वरुटे, नायब तहसिलदार मनोहर पाटील, मंडल अधिकारी विनायक यादव, तलाठी गणेश पवार आदी यावेळी उपस्थित होते. महसूल व वन विभागाच्या वतीने शासनाच्या १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दहा मधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक दहा च्या परिसरामध्ये या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रभागात वडार, कुंचीकोरवी, धनगर, माकडवाले समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. गोरगरीब, मध्यमवर्गीय लोकांना जातीच्या दाखल्यांसाठी आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता.

त्यात ५० वर्षापूर्वीचा पुरावा ही जाचक अट होती. त्यामुळे अनेकांना जातीचे दाखले काढण्यात अडचण येत होती. नागरिकांची होत असलेली ही गैरसोय लक्षात घेत भाजपा भटक्या व विमुक्त जाती जमाती सेलचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सूरज पवार, भाजपच्या कार्यकारिणी सदस्या गीताताई पवार यांच्या पुढाकारातून जातीच्या दाखल्यांसाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील २१०० हून अधिक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. जातीच्या दाखल्यांसाठी प्रस्ताव दाखल केले. त्यांच्या प्रस्तावांची छाणणी झाली. पात्र नागरिकांना येत्या पंधरा दिवसांमध्ये जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

Tags: