yuva MAharashtra महाराष्ट्र केसरीचा ‘खेळ’ नको

महाराष्ट्र केसरीचा ‘खेळ’ नको

सांगली टाईम्स
By -


  • डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील 
  • जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण 
  • अन्यथा पाच मार्चपासून मंत्रालयासमोर उपोषण

सांगली / प्रतिनिधी
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला एक विशिष्ट दर्जा आहे. इतिहास आहे. वलय आहे. पण कुस्तींमध्ये राजकारण घुसल्याने संघटनांच्या वादातून एका -एका वर्षात चार वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. महाराष्ट्र केसरीचा हा खेळ कशासाठी असा सवाल करत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले. दिवसभरात कुस्ती क्षेत्रातील अनेकांनी पाटील यांनी उपोषण स्थळी भेट घेतली. त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. सायंकाळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांच्यासह पदाधिकारयांच्या विनंतीनंतर पाटील यांनी आंदोलन मागे घेतले.

दरम्यान येत्या २८ फेबु्रवारी पर्यंत शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडण्वीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार शरद पवार यांना भेटणार आहे. त्यानंतर मात्र 5 मार्चपासून मंत्रालयासमोरच आमरण उपोषण करु असा इशारा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिला. चंद्रहार पाटील म्हणाले, महाराष्ट्रात कुस्तीला एक वेगळी ओळख आहे. परंपरा, दर्जा आहे. महाराष्ट्राच्या मातीत अनेक ऑलंपिक वीर खाशाबा जाधव यांच्यासह महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी घडले. पण दोन दोन संघटनांच्या वादामध्ये पैलवांनाची गोची झाली आहे. शासन संघटनांमधील वाद मिटत नाही. एका वर्षात चार चार वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत.

हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी गदा परत करणार
कुस्ती क्षेत्रातील मागण्यांबाबत पाच मार्चपर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. सर्व हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी या आंदोलनात सहभागी होतील. कुस्तीसाठी जीव गेला तरी मागे हटणार नाही. जिंकलेल्या गदा शासनाला परत करु. आम्हाला या गदा नकोत असे शासनाला ठणकावून सांगणार आहोत. अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान शिवराज राक्षेवर अन्याय झाला. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या पंचाला राक्षे याने गोळया घालून ठार करावे या वक्तव्यावर मी आजही ठाम असल्याचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगितले. 
येत्या एक मार्च पर्यंत शासनाने संघटनांमधील वाद मिटवावा. एक राज्य, एक खेळ आणि एक संघटना ही संकल्पना राबवावी. राज्यात वर्षात एकदाच महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आयोजित करावी, महाराष्ट्र केसरी विजेत्यास 1 कोटी रुपयांचे बक्षिस द्यावे, तीन वेळा महाराष्ट्र केसरी होणारृयास थेट पोलिस उपअधिक्षक केले जाते. त्याचप्रमाणे एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यास त्या पैलवानास पोलिस उपनिरीक्षक करावे, पैलवान शिवराज राक्षे, पैलवान महेेंद्र गायकवाड यांच्यावरील बंदी हटवावी. राज्य व राष्ट्रीय स्पर्धामध्ये पैलवानांची डोपिंग चाचणी करावी या मागण्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडण्वीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार शरद पवार यांना भेटणार आहे.  पाच मार्चपर्यंत त्यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पैलवान पाटील यांनी दिला.

दरम्यान कुस्तीसह अन्य क्षेत्रातील अनेकांनी आंदोलन स्थळी भेट देत पैलवान चंद्रहार पाटील यांच्या आंदोलनास सक्रिय पाठींबा दिला. श्री आंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथीराज पवार, सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान नामदेवराव मोहिते, पैलवान संभाजी पाटील-सावर्डेकर,काँग्रेसचे प्रा. मोहन वनखंडे, माजी नगरसेवक आयुब बारगीर, महादेव साळुंखे, विजय साळुंखे, विजय नवले, राहूल नवलाई, रमाकांत काटकर, शंभोराज काटकर, प्रदीप माने-पाटील, पै. सचिन पाटील आदींनी आंदोलन स्थळी भेट देत पाठींबा दिला. दरम्यान सायंकाळी सायंकाळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांच्यासह पदाधिकारृयांच्या विनंतीनंतर पाटील यांनी आंदोलन मागे घेतले.



Tags: