yuva MAharashtra एक महिन्यात विशाळगड अतिक्रमणमुक्तीचे आदेश

एक महिन्यात विशाळगड अतिक्रमणमुक्तीचे आदेश

सांगली टाईम्स
By -

विशाळगड अतिक्रमण मुक्त बाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देताना माझी आमदार नितीन शिंदे, भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस, माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे.


महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना; माजी आमदार नितीन शिंदे यांच्या मागणीला यश

सांगली / प्रतिनिधी

विशाळगड अतिक्रमण मुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गडावरील सर्व अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे सक्त आदेश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. गड एक महिन्यात अतिक्रमणमुक्त करू अशी ग्वाही कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असल्याची माहिती विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली. शिंदे यांनी मुंबई मंत्रालय येथे मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली. विशाळगडाच्या पायथ्याशी व विशाळगडावर १५७ अतिक्रमणं झालेली आहेत ती अतिक्रमणं तोडण्यासाठी सरकारने आदेश देऊन निधी सुद्धा वर्ग केला आहे. या १५७ अतिक्रमणांपैकी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ९० अतिक्रमणं तोडल्याचा दावा केला आहे. 

मलिक ए रेहानच्या थडग्यावर बांधलेले बेकायदेशीर बांधकाम व विशाळगडावरील मलिक ए रेहानच्या बेकायदेशीर दर्ग्याच्या भोवती झालेली बांधकामे व विशाळगडाच्या पायथ्याशी झालेली बेकायदेशीर बांधकामे तोडण्याची मोहीम सुरू झाली असताना काहींनी कोर्टामध्ये धाव घेतली.  कोर्टाने अतिक्रमण काढण्याची मोहीम पावसाळ्यात थांबवावी व पावसाळा संपल्यानंतर अतिक्रमण काढण्याची मोहीम पुन्हा सुरू करावी असा निकाल दिला होता. परंतु हिवाळा संपत आला तरीसुद्धा कोल्हापूर जिल्हा प्रशासन ही मोहीम सुरू करत नाही, चाल ढकलपणा करत आहे ह्या विरोधात विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीने नुकताच कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन ही देण्यात आले होते.

शिवभक्तांच्या भावना संतप्त आहेत त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना अतिक्रमण तोडण्याची मोहीम सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शिंदे यांनी मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली. मंत्री बावनकुळे यांनी तातडीने कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत ताबडतोब अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करावी असे आदेश दिले. कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी एक महिन्याच्या आत विशाळगडावरील सर्व अतिक्रमण हटवू अशी ग्वाही मंत्री बावनकुळे यांना दिली असल्याचे माजी आमदार शिंदे यांनी सांगितले. 

Tags: