yuva MAharashtra महादेव मंदिर अन् बोर्डिंगच्या नूतन वास्तूसाठी सर्वोतोपरी सहकार्य

महादेव मंदिर अन् बोर्डिंगच्या नूतन वास्तूसाठी सर्वोतोपरी सहकार्य

सांगली टाईम्स
By -

लिंगायत बोर्डिंगमध्ये श्री महादेव मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात दीप प्रज्ज्वलन करताना सोलापूरचे जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी. सोबत गडहिंग्लजचे श्री महांत सिद्धेश्वर महास्वामीजी, म्हैसाळचे डॉ. शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी, आमदार सुधीर गाडगीळ, अमोलराजे भोसले, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, माजी अध्यक्ष सुधीर सिंहासने, अध्यक्ष सुशील हडदरे, उपाध्यक्ष अशोक पाटील, विनायक शेटे आदी.

महास्वामीजी अन् लोकप्रतिनिधीची संचालक मंडळाला ग्वाही : अलोट गर्दीत मंदिराचे भूमिपूजन

सांगली / प्रतिनिधी

श्री मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगमध्ये श्री महादेव मंदिर, श्री अक्कमहादेवी, दान्नम्मादेवी मंदिराची भव्य वास्तू साकारण्यात येणार आहे. सोबतच सुसज्ज असे बोर्डिंग, अनुभवमंटपासह भव्य वास्तू उभारण्याचा संकल्प आहे. यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही सर्व महास्वामीजी, लोकप्रतिनिधींनी बोर्डिंगचे अध्यक्ष, पदाधिकारी संचालकांना दिले. श्री महादेव मंदिराचे भूमिपूजन श्री गुरूदेव सेवा संस्था समाधान सोलापूरचे  म. नि. प्र. जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्याहस्ते व सुक्षेत्र संस्थान हिरेमठ म्हैसाळचे चक्रवर्ती डॉ. शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी, बिलवाश्रम मठ गडहिंग्लजचे श्री महांत सिद्धेश्वर महास्वामीजी जडेय सिद्धेश्वर, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

याप्रसंगी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, श्रीमती शैलजाभाभी पाटील, डॉ. रवींद्र पाटील, क्रीडाईचे अध्यक्ष जयराज सगरे, बोर्डिगचे अध्यक्ष सुशील हडदरे, माजी अध्यक्ष सुधीर सिंहासने, उपाध्यक्ष अशोक पाटील, सेक्रेटरी सुनील कोरे, खजिनदार विनायक शेटे, सहसचिव जयवंत मोतुगडे, संचालक प्रदीप दडगे, दीपक खोकले, रमेश दडगे, सौ. सविता आरळी, व्यवस्थापक सतीश मगदूम,  आदी उपस्थित होते.

सुधीर गाडगीळ म्हणाले, लिंगायत समाजातील विविध मान्यवरांचे जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान आहे. राजकारणाबरोबरच उद्योग-व्यवसायात समाजाची आघाडी आहे. मला समाजाचे मोठे पाठबळ आहे. शहरातील मध्यवर्ती मंदिर आणि बोर्डिंग, अनुभव मंटप वास्तूसाठी मी सर्वतोपरी मदत करेन. दिनकरतात्या पाटील, शैलजाभाभी पाटील यांनीही खासदार विशाल पाटील यांच्या माध्यमातून मोठी मदत करू.

समाजाच्या एकीची ताकद गरजेची

सुशील हडदरे, सुधीर सिंहासने म्हणाले, लिंगायत समाज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. ती ताकद एकवटणे गरजेचे आहे. महापालिकेत याच माध्यमातून आपण सर्वपक्षीय ११ नगरसेवक निवडून आणले होते. त्या माध्यमातून महापालिकेचे महात्मा बसवेश्वर निदान केंद्र उभारले आहे, लवकरच पुतळा उभारणीही केली जाईल. मंदिराची उभारणी समाजाकडून होईल. बोर्डिंगची भव्य वास्तू, शैक्षणिक संकुलाच्या माध्यातून समाजाला प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करू. यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मदत घेऊ.

गडहिंग्लजचे श्री महांत सिद्धेश्वर महास्वामीजी म्हणाले, 1930 मध्ये श्री जडेय सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी सांगलीत मुक्काम करून बोर्डिंगच्या जडणघडणीत योगदान दिले. मुलांना शिक्षणासाठी सोय करून दिली होती. आता मी त्यांचा वारसदार या नात्याने बोर्डिंगच्या सर्वतोपरी विकासात योगदान देण्यास कटिबद्ध आहे. डॉ. शिवयोगी शिवाचार्य म्हणाले, मंदिरासोबतच बोर्डिंगच्या नूतन वास्तूसाठी, सोबतच शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी मी स्वत: झोळी घेऊन समाजबांधवांमध्ये जावून फिरेन.

ADVT.

अध्यक्ष सुशील हडदरे म्हणाले, बोर्डिंगला आणि मंदिराला मोठा पवित्र वारसा लाभला आहे. येथे श्री जडेय सिद्धेश्वर महास्वामींच्या पदस्पर्शाने पुनित ही जागा आहे. समाजबांधवांच्या सहकार्याने भव्य मंदिर आणि या वास्तू उभारणीसह समाजाच्या बांधणी आणि प्रगतीसाठी बोर्डिंगच्या माध्यमातून आम्ही सर्व ताकद पणाला लावू. सतीश मगदूम यांनी आभार मानले. याप्रसंगी उदय सांबारे, सुरेश घेवारे, सुनील कबाडगे, गौतम खुजट, ईश्वराप्पा सबरद, राजू साबणे, योगेश कापसे, चवगोंडा देशिंगे, मंदार चौगुले आदींसह अक्कमहादेवी महिला मंडळाच्या पदाधिकारी, महिला, बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tags: