सावळसिद्ध विकास सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत ठराव
सावळज / प्रतिनिधी
नियमित कर्जदारांना थकबाकीदारा एवढीच कर्जमाफी द्या, अशा मागणीचा ठराव सावळज ता . तासगाव येथील सावळसिद्ध विकास सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. राज्य शासनाच्या संभावित कर्जमाफीच्या अनुषंगाने चर्चा करून निर्णय घेण्यासाठी संस्थेने विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती. यासंबंधी ठरावाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना संचालक मंडळांने लेखी द्यावे,असा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्याच्या सर्वत्रिक विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. शेतकरी वर्ग कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारकडून कधी होईल याच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांच्या मध्ये कर्जमाफीची चर्चा असल्याने कोणीही कर्ज भरायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या विकास सोसायट्या अडचणीत येणार आहेत. पर्यायाने शेतकरीही अडचणीत येणार आहे. सभासदांच्या मागणीनुसार श्री सावळसिद्ध विकास सोसायटी,सावळज या संस्थेने संभावित कर्जमाफीच्या अनुषंगाने चर्चा करून निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवली होती. त्यामध्ये नियमित कर्जदारांना थकबाकीदारा एवढीच कर्जमाफी द्या, अशा मागणीचा ठराव करण्यात आला. कर्जमाफी मध्ये थकबाकीदारांनाच कर्जमाफी होते व नियमित कर्जदार कर्जमाफी पासून वंचित राहतो. त्याला प्रोत्साहनपर किरकोळ कर्जमाफी दिली जाते. नियमित कर्जदार हा प्रामाणिकपणे कर्ज भरत असतो. थकबाकीत न जाता आपली पत सांभाळतो. त्याच्यावरच अन्याय होत आहे.
जर नियमित कर्जदारांनी थकबाकी केली तर सर्व संस्था बंद पडतील. नियमित कर्जदारांच्या मुळे विकास सोसायटी सक्षम आहेत. याची राज्य सरकारने नोंद घेऊन कर्जमाफी त्यांना समाविष्ट करून घ्यावे. असा एकमताने ठराव करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन शिवाजी पाटील, व्हा. इंदुताई पोळ, संचालक ऋषिकेश बिरने, प्रशांत कुलकर्णी, बाळासो थोरात, विजय पाटील, बाळासो निकम, विनायक पवार, संदीप माळी, प्रदीप माळी, विलास तोडकर, राजेंद्र वांडरे, पिंटू बुधवले, राजेंद्र सावळज कर, सचिव निलेश रिसवडकर व मोठ्या संख्येने सभासद व शेतकरी उपस्थित होते.
