सांगली / प्रतिनिधी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या विरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आकाश दिगंबर डाळवे (वय ३०, रा. यावळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) व अविनाश बापू पुकळे (वय ३०, रा. पारे कोकरेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान या प्रकरणी आणखी ९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
श्रीमती चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. काही महिन्यापासून त्यांच्या विरोधात राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेज वरून आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात होत्या. त्यावर अनेकजणांनी आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. या प्रकरणी महिला आयोगाकडून सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलिसांकडून भारतीय दंड संहिता कलम ७८, ७९, ३५१(३), ३५१(४), ६१(२) BNS तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६७A अंतर्गत मुंबई सायबर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक आरोपी आकाश दिगंबर डाळवे (वय ३०, रा. यावळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे तर अविनाश बापू पुकळे (वय ३०, रा. पारे कोकरेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याला उरळी कांचन, जि. पुणे येथून अटक करण्यात आली.
या दोघांना आज गिरगाव येथील १८ व्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या पूर्वी या प्रकरणात एकूण ९ आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे.
