सांगली / प्रतिनिधी
पक्ष विरोधी भूमिका, शिस्तभंग केल्याप्रकरणी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तम्मणगौडा रवी पाटील यांची भारतीय जनता पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. दोघांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. भाजपाच्या या कारवाईमुळे जगताप यांच्यासह रवीपाटील यांना मोठा राजकीय धक्का बसला असून त्यांची पुढील भूमिका काय असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
भारतीय जनता पार्टीत काम करत असताना माजी आमदार विलासराव जगताप यांची भूमिका नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार संजय पाटील यांना कडवा विरोध केला. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना बळ दिले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही भूमिपुत्रांचा मुद्दा उपस्थित केला.
भजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांना विरोध करत बंडखोर उमेदवार तम्मणगौडा रवी पाटील यांचा प्रचार केला. यासह अन्य कारणांमुळे जगताप, रवी पाटील यांचे पक्षातील स्थान धोक्यात आले होते. पक्ष प्रदेश नेतृत्वाने याची गंभीर दखल घेत दोघांची पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
