yuva MAharashtra काय सांगताय? ५० कोटींच्या कामांमध्ये घोटाळा

काय सांगताय? ५० कोटींच्या कामांमध्ये घोटाळा

सांगली टाईम्स
By -

अजितदादा पवार दखल घेणार की पाठीशी घालणार

सांगली / प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगली महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी तब्बल ५० कोटींचा निधी दिला आहे. पण सांगली त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या निधीचा अक्षरशः बाजार मांडला आहे. कामे मॅनेज करण्यात आली आहेत. बड्या ठेकेदारांकडून लाखो रुपये उचलण्यात आले आहेत. जाचक अटी टाकत नवखा ठेकेदार स्पर्धेत उतरणारच नाही, अशी तजवीज करण्यात आली आहे. दरम्यान अजितदादांचेच काही पदाधिकारी आता ठेकेदार झाले असून डमी ठेकेदार उभा करत स्वतः कामे सुरू केल्याने विकास राहिला बाजूला पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या बाजाराची मात्र खुमासदार चर्चा सांगलीत सुरू आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगली महापालिका क्षेत्राच्या विकासाची १०० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. मात्र ठाकरे सरकार गडगडल्याने निधी मिळाला नाही. त्यांनतर अजितदादा महायुती सरकार मध्ये सहभागी झाले. त्यांनी ५० कोटी देण्याचे मान्य केले. पैसे मंजूर झाले. पण या निधी मधून प्रस्तावित केलेल्या कामांचा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः बाजार मांडला. टक्का वाढवला. कामांची 'इस्टीमेट' जाणीवपूर्वक वाढविण्यात आली आहेत. अनेक कामे एकाच निविदेत घुसडत ठराविक ठेकेदारालाच काम मिळाले पाहिजे अशी तरतूद करण्यात आली.
अजितदादांकडे तक्रार करणार
राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या 'जाऊ तेथे खाऊ ' या वृत्तीमुळे पक्षाची प्रचंड नाचक्की सुरू आहे. यात आता ५० कोटींच्या कामावरून पुन्हा हेच पदाधिकारी चर्चेत आले आहेत. अजितदादांनी ५० कोटींचा निधी शहरांच्या विकासासाठी दिलाय की पदाधिकाऱ्यांच्या असा सवाल सर्वसामान्य सांगलीकर उपस्थित करू लागले आहेत. दरम्यान या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून पुराव्यांसह तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले. 
त्यामुळे अनेक छोटे ठेकेदार कामापासून वंचित राहिले आहेत. या निधितील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगसगिरी झाली आहे. काही पदाधिकारी स्वतः च ठेकेदार बनले आहेत. डमी ठेकेदार उभा करत स्वतःच कामे करण्यास त्यांनी सुरवात केली आहे. सांगली, मिरजेतील काही कामे यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनानेही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत राष्ट्रवादीच्या 'मलिदा गँग'ला रान मोकळे करून दिले आहे. त्यामुळे प्रशासन ही या मध्ये सहभागी असल्याची चर्चा सांगलीत सुरू आहे. या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात येणार आहे.