yuva MAharashtra कामे कमी आणि नखरे जास्त

कामे कमी आणि नखरे जास्त

सांगली टाईम्स
By -

आमदार रोहित पवार

आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

सांगली / प्रतिनिधी

रुसवे, फुगवे, नाराजी आणि शह कटशहाचे राजकारण अश्या महायुती सरकारची ‘कामे कमी आणि नखरे जास्त’ अशीच काहीशी स्थिती आहे. तिन्ही पक्षांना त्यांना स्वतःला अनपेक्षित बहुमत मिळूनही निकालानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी १२ दिवसांनी, मंत्रिमंडळ विस्तार २२ दिवसांनी, खातेवाटप ३० दिवसांनी तर पालकमंत्री वाटप तब्बल दोन महिन्यांनी झाले. त्यातही आता रायगड, नाशिकच्या पालकमंत्री वाटपावरून वाद निर्माण झाल्याने २४ तासाच्या आत सरकारला नवीन GR काढावा लागला अशी खरमरीत टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

सरकारमध्ये एकीकडे कोण आंदोलन करतंय तर कोण नाराज होऊन गावाला जातंय, तर दुसरीकडे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री दावोसला सुद्धा एकत्र जात नाहीत. शिवाय उद्योगमंत्र्यांची दावोसची हॉटेल रूमसुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाने बुक केली. एवढी टोकाची अनागोंदी आणि अविश्वास या सरकारमध्ये आहे.

ADVT.

आज सरकार स्थापन होऊन अनेक दिवस झालेत पण जनतेला सरकार किंवा मंत्र्याची कामे कुठेही दिसत नाहीत परंतु गुन्हेगारी मात्र सर्वत्र वेगाने वाढताना दिसत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रु, युवांना रोजगार या आश्वासनांचा सरकारला बहुधा विसर पडला असावा. या सगळ्या अविश्वासू वातावरणात आपसातले हेवेदावे बाजूला सारून सरकारने जनहिताची कामे करावीत, ही लोकांची अपेक्षा सरकार पूर्ण करेल की नाही, हा आज प्रश्नच आहे.

Tags: